दूरदेशीचे स्थानिक मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:00 AM2019-07-18T06:00:00+5:302019-07-18T06:00:05+5:30
30 वर्षांपूर्वी औरंगाबाद विद्यापीठात शिकणारा केनियन तरुण. आता खासदार झाला, आणि पूर्वीची थकलेली 200 रुपये उधारी द्यायची म्हणून दुकानदाराला शोधत औरंगाबादला आला. आफ्रिकी-आखाती देशातल्या अशाच तरुणांचं एक जग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे. त्या जगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न
- राम शिनगारे
औरंगाबादेतील मौलाना आझाद शिक्षण संस्थेत 1985 ते 89 या काळात तो एमबीए करत होता. मूळचा केनियाचा. रिचर्ड न्यागका टोंगी असं त्या तरुणाचं नाव होतं. काळ पुढे सरकला आणि आता 30 वर्षांनी तो तरुण पुन्हा औरंगाबादला आला.
आता तो सामान्य तरुण राहिलेला नाही, तर केनियात खासदार तथा संरक्षण-परराष्ट्र समितीचा उपाध्यक्ष आहे.
एका खासदाराने आपल्या भारतभेटीत धावतपळत औरंगाबादला का यावं?
तर या खासदारसाहेबांना उधारी फेडायची होती. 30 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये शिक्षण घेत असताना 200 रुपयांची एका किराणा दुकानदाराची उधारी थकली होती. भारतात आल्यावर त्यांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ते पूर्वीचं दुकान शोधून काढलं. काशीनाथराव गवळी यांचं ते दुकान.
विद्यापीठासह मौलाना आझाद शिक्षण संस्थेत 1985 च्या काळात 100 पेक्षा अधिक केनियन विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यातलेच टोंगी एक. या विद्यार्थ्याला किराणा दुकानदार व घरमालक काशीनाथराव यांनी खूप मदत केली. आर्थिक अडचण होतीच, पण कधीही पैशासाठी तगादा लावला नाही. शिक्षण संपल्यानंतर टोंगी मायदेशी परतले. मात्र त्यांच्या लक्षात आलं की, घरमालकाचे 200 रुपये आपण दिलेच नाही. तेव्हापासून त्यांच्या मनात होतं की भारतात गेलं की गवळींना भेटायचं आणि पैसे द्यायचे. मात्र बराच काळ ते साधलं नाही. आता खासदार म्हणून ते भारतभेटीवर आले. दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले आणि तिकडून वेळात वेळ काढून औरंगाबादला आले. आपल्या पत्नीसह त्यांनी पूर्वीच्या खाणाखुणा हुडकत दुकानदाराला शोधलं. जेव्हा दुकानदार गवळी भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. खरं तर त्या तरुणाकडे आपले पैसे राहिलेत हे दुकानदारही विसरून गेले होते. अचानकपणे पैसे देण्यासाठी दारावर आलेल्या टोंगी यांच्यामुळे दुकानदार काशीनाथराव हेसुद्धा आवाक् झाले. अर्थात त्यांनी काही ती उधारी घेतली नाही, कारण या प्रेमाचं मोल ते काय करणार होते? मात्र ते पैसे घेत नाहीत म्हटल्यावर टोंगी यांनी मायेन घरातील पाच मुलांना प्रत्येक 50 युरो भेट दिले. यानंतर गवळी कुटुंबानेही मराठमोळ्या पद्धतीने टोंगी दांपत्याचा यथोचित सन्मान केला.
गेल्या आठवड्यातली ही घटना. औरंगाबाद विद्यापीठात दक्षिण आफ्रिकी देशातली अनेक मुलं शिकतात. कशी राहतात ही मुलं इथं? इथल्या समाजाशी कसं जुळवून घेतात हे यानिमित्तानं जरा शोधायचं ठरवलं आणि अनेक मुलांशी गप्पा मारल्या. औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी आलेल्या आफ्रिकी, अखाती देशातील विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हक्कासाठी आता देशनिहाय संघटनांची नोंदणीही केली आहे. केनिया, सुदान, इराण, सिरीया, येमेन, इथोपिया अशा विविध देशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या देशांमध्ये सतत सामाजिक, राजकीय, लष्करी संघर्ष उद्भवतो. त्यातून बाहेर पडत हे विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येतात.
मुंबई-पुणं सोडून अनेक आखाती, आफ्रिकी मुलं औरंगाबाद शहराची निवड करतात, कारण अल्प शैक्षणिक शुल्क आणि विद्यार्थ्यांना मिळणा-या सुविधा. या मुलांकडे पैसा कमीच असतो, काटकसरीनं ते गुजारा करतात. 1980 पासून हे तरुण इथं शिकायला येतात, तेव्हापासून केनियाच्या दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये शिक्षण घेतलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिकणारा जोशुआ बीओट. मागील दहा वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये आहे. पदवी ते पीएच.डी. असं शिक्षण घेतोय, आता वृत्तपत्र विभागात शिकतोय. तो म्हणतो, ’इथलं वातावरण शिक्षणाला पोषक आहे. औरंगाबाद शहरात परदेशी विद्यार्थी एकोप्याने राहतात. अर्थात आफ्रिकन विद्यार्थ्यांना रंगभेदी टिप्पण्या कधीकधी ऐकाव्या लागतात. त्यामुळे आता आफ्रिकन विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घटली आहे. मात्र तरीही औरंगाबाद हे शहर केनियाच्या विद्यार्थ्यांंना खूप आवडते. या ठिकाणी बहुतांश विद्यार्थी वाणिज्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. याशिवाय वृत्तपत्र, व्यवस्थापन, राज्यशास्त्र, लोकप्रशासन या विषयातही रूची दाखवतात.’ शोषित, वंचित आणि पीडितांना जगण्याचं बळ देणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात शिक्षण घेताना स्वत:वर, देशावर होणार्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळही मिळते, असंही जोशुआ प्रांजळपणे कबूल करतो. मागील दहा वर्षांपासून औरंगाबादेत तो राहतोय. इथं अनेक चांगले लोक जोडले गेले. काहींनी त्रास दिला तर त्याविरोधात साथ देणारेही अनेक भारतीय आहेत, असंही जोशुआ सांगतो.
सिरीयातील फिरास स्वैद आणि लिन इसा स्वैद हे दांपत्य औरंगाबादच्या विद्यापीठातील इंग्रजी आणि वृत्तपत्र विभागात पीएच.डी. करत आहे. लिन इसा यांच्याशी संवाद साधला असता, त्या सांगतात, ‘भारत देश हा आम्हाला अतिशय जवळचा देश वाटतो. या देशातील हिंदी भाषा ही अरेबीक भाषेशी थोडीफार जवळची वाटते. आमच्या संवादाचं माध्यम इंग्रजी असलं तरी तेसुद्धा जवळचे वाटते. कारण भारतीय इंग्रजीमध्येही अरेबीक, हिंदी शब्द येतात. याशिवाय या ठिकाणचे राहणीमान, जेवणाच्या पद्धतीही जवळपास सारख्या आहेत. या ठिकाणी मिळणारे शिक्षणही आमच्या दृष्टीने जगातील सवरेत्तम आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागातून सेवानिवृत्त झालेले आणि एमजीएम शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सुधीर गव्हाणे यांची नुकतीच परदेशी विद्यार्थ्यांंच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत या विद्यार्थ्यांंच्या संघटनेच्या पदाधिका-यानी शिक्षण घेत असताना परदेशी विद्यार्थ्यांंसाठी एक खिडकी योजना, राहण्याच्या सुविधा, प्रवासाची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी केली. या विद्यार्थ्याविषयी बोलताना डॉ. गव्हाणे सर सांगतात, ‘आफ्रिका, अखाती देशांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांंना भारतातील शांतता, लोकशाहीची प्रक्रिया अतिशय प्रिय असते. सिरीया, येमेनच्या विद्यार्थ्यांंना शांतता आवडते. भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीही या विद्यार्थ्यांंच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. विकसित देशातील शिक्षण अधिक महाग मिळते. त्या तुलनेत भारतातील शिक्षण स्वस्त आहे. म्हणून भारताला हे विद्यार्थी सेकंड होम समजतात. माझ्या मार्गदर्शनाखाली पाच देशांचे विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करतात. त्या विद्यार्थ्यांंची शिक्षणाविषयी तळमळ कौतुकास्पद आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे सांगतात, ‘विद्यापीठातील एमबीए, वाणिज्यसह सामाजिकशास्त्र या विषयात आखाती, आफ्रिका देशातील विद्यार्थी संशोधन, पदव्युत्तरचे शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांंना औरंगाबादेत निवास करताना आपण स्वत:च्या देशातच शिक्षण घेत असल्याचा भास होतो. कारण त्यांच्या निर्माण झालेल्या गरजा अत्यल्प पैशांमध्ये पूर्ण होतात. याविषयी त्यांच्या देशांच्या तुलनेतील अत्याधुनिक शिक्षणही मिळतं. त्यातही विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आणि आफ्रिका देशातील विद्यार्थ्यांंच्या संवादामध्ये असलेली तफावत आणि आपल्याकडील ‘चलता है’ संस्कृतीचा फटकाही या विद्यार्थ्यांंना अनेकवेळा बसतो. हा दूर करण्यासाठी आखाती देशातील विद्यार्थ्यांंंना स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे. या विद्यार्थ्यांंच्या माध्यमातून विद्यापीठाच्या आर्थिक तिजोरीतही मोठय़ा प्रमाणावर भर घातली जाते,’ असेही डॉ. सरवदे सांगतात.
औरंगाबादेत वास्तव्याला असलेल्या अखाती, आफ्रिकन देशाच्या विद्यार्थ्यांंंमुळे गोंधळ, गडबड झाल्याच्या घटनाही आजवर घडलेल्या नाहीत. हे विद्यार्थी विशिष्ट परिसरात राहतात. कॉलेज, विद्यापीठात जाण्यापुरतेच बाहेर फिरतात. आपले शिक्षण भले आणि आपण या न्यायाने वागतात. याचा त्यांनाही फायदा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याविद्यार्थ्यांंसाठी आता स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांंना पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएच.डी. संशोधनासाठी सहजरीत्या प्रवेश मिळेल, याकडेही लक्ष पुरवलं आहे. यासाठी स्वतंत्र फॉरेन स्टुडण्ट्स सेलची स्थापनाही केली आहे.
या तरुणांचं एक वेगळं जग आहे, म्हटलं तर स्थानिक मातीशी जोडलेलं, म्हटलं तर अलिप्त. त्यांचा देश, संस्कृती आणि जगणं समजून घेत दोस्ती करण्याची एक संधी खरं तर स्थानिक विद्यार्थ्यांंनाही आहेच.
अर्थात, दोस्तीचा हात पुढं केला तर.!
( राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)
rparanwadikar@gmail.com