व्हिण्टेज जर्सी लकी ठरेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 07:56 AM2020-12-03T07:56:56+5:302020-12-03T08:00:25+5:30

भारतीय संघ सध्या व्हिण्टेज जर्सी घालून खेळतोय, कशी बदलली आजवर ही जर्सी.

Would a vintage jersey be lucky? | व्हिण्टेज जर्सी लकी ठरेल?

व्हिण्टेज जर्सी लकी ठरेल?

Next

- अभिजित पानसे

सत्तरीतील किंवा तत्कालीन हिंदी सिनेमे बघताना किंवा घरातील ज्येष्ठ पुरुष मंडळींचे तत्कालीन फोटो बघितले की, त्याकाळची बेल बॉटम फॅशन लक्ष वेधतेच. पण म्हणतात ना, हिस्ट्री रिपिट्स इटसेल्फ. ते फॅशनबाबतसुद्धा लागू होतं. गेलेली फॅशन पुन्हा परत येते. तर हा विषय सध्या आला, कारण भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व्हिण्टेज जर्सी परिधान करून खेळत आहे.

गडद नेव्ही ब्ल्यू रंगाची ही भारतीय जर्सी, क्रिकेट रंगीत कपड्यात खेळायला सुरुवात झाल्यापासूनची सर्वोत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतीय क्रिकेट टीम यात अत्यंत स्मार्ट दिसतेय. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या १९९२च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने ही जर्सी परिधान केली होती. यार जर्सीमध्ये कपिल देव, सुनील गावस्कर इत्यादी महान क्रिकेटपटू खेळले आहेत. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अत्यंत थरारक सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करून सामना जिंकून देणारा सचिन तेंडुलकर आठवतो. ऑस्ट्रेलिया बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड हे सहमतीने तत्कालीन व्हिण्टेज जर्सी परिधान करून सध्या खेळत आहेत.

एकदिवसीय क्रिकेट शुभ्र जर्सीतून जेव्हा रंगीत जर्सीत खेळले जाऊ लागलं तेव्हापासून भारताने निळ्या रंगाला आपलं मानलं आहे.

क्रिकेटच्या बदलत्या रंगाची ही गोष्ट

१. १९९२ नंतर १९९६मध्ये आशिया उपखंडात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपमधील टी-शर्ट काहीसा मोरपंखी निळा होता. त्यावर मध्ये पिवळा पॅच होता. या जर्सीमध्ये बंगलोरला पाकिस्तानविरुद्ध अजय जडेजाने वकार युनूसला मारलेले शॉट व भारताचा विजय संस्मरणीय आहे; पण याच जर्सीतील कोलकाता ईडन गार्डनमध्ये श्रीलंके विरुद्ध झालेला दुःखी करणारा पराभवही लक्षात आहे.

२. इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पोशाख, जर्सी आजवरील सगळ्यात टुकार व विनोदी होती असं म्हणायला हरकत नाही.

त्यानंतर मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर भारतीय टीममध्ये बरेच स्मार्ट बदल झाले तसे त्यांच्या जर्सीमध्येही झाले.

३. २००३ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकपमध्ये स्टायलिस्ट पोषाखावर, टी-शर्टवर दोन काळे पट्टे, समोर तिरंगा लोगो होता. संघातील जुने ज्येष्ठ जाऊन नव्या दमाचे झहीर खान, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, आशिष नेहरा अशी युवा ब्रिगेड आली होती. आजूबाजूचं जग पर्यायाने क्रिकेट व माध्यमे स्मार्ट होत होती. या नव्या जर्सीमध्ये भारतीय टीम हॅण्डसम झहीर खान, युवराज सिंग अधिकच देखणे दिसत होते.

४. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या २००७च्या वर्ल्डकपमध्ये एकंदरीत सगळंच मरगळ निर्माण करणारं होतं, भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीसहित.

पूर्वी शाळेच्या शुभ्र कपड्यांना अतिरिक्त नीळ टाकलेल्या पाण्यात भिजवून बाहेर काढून ते शुभ्रपेक्षा मळक्या निळ्या रंगाचे दिसावेत असा उदास मळक्या निळ्या रंगाचा भारतीय टीमचा मैदानातील पोशाख होता. त्यात पहिल्याच राउण्डमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला होता.

५. भारतात झालेल्या २०११चा वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या २०१५च्या वर्ल्डकपमधील भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीमध्ये विशेष फरक नव्हताच. २०११ची क्रिकेट जर्सी मात्र कायमस्वरूपी विशेष असणार आहे कारण भारतीय संघाने त्याच जर्सीत वर्ल्डकप जिंकला.

६. मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये २०१९मध्ये झाला तेव्हा भारतीय संघाने नेहमीप्रमाणे मेरा वाला ब्ल्यू म्हणत फिरोजा निळ्या शेडमध्ये जर्सी परिधान करत वर्ल्डकप खेळला. मात्र न्यूझीलंडच्या ब्लॅक कॅपने भारतीय निळ्या खंड्या पक्ष्याचं उड्डाण सेमी फायनलमध्येच रोखलं.

७. २०२० वर्ष हे निराळंच वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेली महामारी या वर्षात आली आहे. हिस्ट्री रिपिट्स इटसेल्फ. गेलेली फॅशन परत येते तशी २८ वर्षांपूर्वीचं डिजाइन असलेली जर्सी भारतीय संघ पुन्हा एकदा खेळत आहे. भारताने एकदिवसीय मालिका तर गमावली; पण आता या व्हिण्टेज जर्सीमध्ये भारताने ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका जिंकावी ही इच्छा आहे.

(अभिजित ब्लॉगर आहे.)

abhijeetpanse.flute@gmail.com

Web Title: Would a vintage jersey be lucky?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.