कुस्ती बायांचा खेळ हाय का? असं विचारणा-या प्रत्येकाला चोख उत्तर देणा-या कुस्तीगीर मुलींच्या शाळेतून लाइव्ह रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 12:17 PM2017-08-31T12:17:17+5:302017-08-31T12:17:50+5:30

कुस्ती म्हटली की ‘दंगल’ आठवतो. पण त्यापलीकडे महाराष्टÑाच्या मातीत आता मॅटवरची कुस्ती रंगतेय. कितीतरी मुली कुस्तीगीर म्हणून स्वत:ला घडवताहेत. त्यासाठी कुणी घरं सोडली, कुणी गावं; मात्र कुस्ती सोडली नाही. लोकांनी नावं ठेवली. खुराकाचे प्रश्न आहेतच, पैशाची रड तर मोठीच; पण तरी मनगटात जोर असा की, समस्यांना चीत करण्याचं या मुलींनी ठरवलं आहे. कुठं भेटतात या मुली, चला आळंदीला कुस्तीच्या मॅटवर एक नवीन धाकड चित्र नक्की दिसेल..

Wrestling Left Sports? Live report from the wrestling girls' school that gives everyone a great reply | कुस्ती बायांचा खेळ हाय का? असं विचारणा-या प्रत्येकाला चोख उत्तर देणा-या कुस्तीगीर मुलींच्या शाळेतून लाइव्ह रिपोर्ट

कुस्ती बायांचा खेळ हाय का? असं विचारणा-या प्रत्येकाला चोख उत्तर देणा-या कुस्तीगीर मुलींच्या शाळेतून लाइव्ह रिपोर्ट

googlenewsNext

-हिनाकौसर खान-पिंजार
छोटंसं गाव. गावात राहणारा कुस्तीच्या वेडाने झपाटलेला बाप. आपला कुस्तीचा छंद आणि वारसा पुढे चालावा यासाठी घरात मुलगा जन्माला यावा अशी त्याची इच्छा. पण जन्माला आली मुलगी. पण बापाने मुलीला कुस्तीच्या आखाड्यात उतरवले. मुलगी बापाच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागली. परिसरातली कुस्त्यांची मैदानं गाजवू लागली...
तुम्ही म्हणाल, काय दंगल सिनेमाची कथा सांगताय का?
तर नाही. ही गोष्ट महाराष्ट्रात कुस्तीगीर म्हणून मैदानं गाजवणा-या काही मुलींची.
कुस्ती हा अजूनही आपल्याकडे पुरुषी खेळ म्हणून पाहिला जातो. आपल्याला आपल्यापेक्षा सवाई पहलवान ठरेल असा मुलगा व्हावा असं अनेकांना वाटतं. पण मुलीही सवाई ठरत पहलवानी करू लागल्या आणि कुस्तीची कहाणी बदलू लागली.
पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाºया आळंदी येथील जोग महाराज व्रारार व्यायामशाळेत सकाळच्या वेळेत कुस्तीचा सराव खेळ चांगलाच रंगला होता. चाल- प्रतिचाल, प्रतिकार-आक्र मण, चीतपट करत कुस्तीगीर एकमेकांना चांगलेच झुंजवत होते. कुस्ती खेळणाºया पोरींची अंगकाठी अगदी बारकी, किरकोळ. पण त्या निकरानं झुंजत होत्या.
गेल्या काही वर्षांपासून ‘महिला कुस्तीगीर’ म्हणून नावारुपाला आलेल्या आळंदीच्या कुस्तीगीर मुलींना भेटायला आळंदीला पोहचले. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच असणारे दिनेश गुंड यांनी स्वखर्चानं हा सगळा डोलारा उभा केला आहे. इथं अख्खा महाराष्ट्र भेटतो. इंदापूर, राजगुरुनगर, सोलापूर, सासवड, ठाणे, संगमनेर, धरणगाव-जळगाव, सांगली, राहुरी, बीड, सोलापूर, परभणी, भंडारा, नागपूर अशा राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या मुली भेटल्या इथं.
इंदापूरच्या राळवाडी या छोट्याशा गावातील हर्षदा गंगाराम जाधव. ती कुस्ती खेळायला लागली तेव्हा गावकºयांनी कधी टोमणे तर कधी प्रत्यक्षच बोलून कुटुंबाला हैराण केलं. ‘कुस्ती काय बायांचा खेळ हाय का?’, ‘बाहरेच्या माणसांपुढं पोरगी कुस्ती खेळणार हे बरं दिसतं का?’ असं बरंच काही ऐकून घ्यावं लागलं. हर्षदाचं काय अश्विनी, रुपाली, संगीता, ओमेश्वरी, निकिता या सगळ्यांच हा कॉमन अनुभव.
रुपाली सांगत होती, शाळेतल्या मुलीसुद्धा नावं ठेवायच्या. कुस्ती काय खेळायचं, बाप्यांसारखं खेळणं बरं दिसतं का असा प्रश्न त्यांना पडायचा. मैत्रिणीच नाकं मुरडतात म्हटलं की खूप वाईट वाटायचं; पण तिकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्यायही नसायचा. त्यात परिसरात खेळायला मुली नसल्यानं भावांबरोबर प्रॅक्टिस करावी लागायची. सगळे हसायचे. भावांबरोबर काय मारामारी करता, त्यांच्या ताकदीपुढं निभाव काय लागणार म्हणून मुली चिडवायच्या.’
हर्षदाच्या घरात पहलवानी होती. वडिलांनी कुस्ती खेळली होती. पण पुढे संसाराचा गाडा रेटताना ती मागे पडली; पण आवड कमी झाली नव्हती. वडिलांची इच्छा होती की, मुलांनी कुस्ती खेळावी, आखाडे गाजवावेत. त्यामुळे तिचे भाऊ कुस्ती खेळायचे. घरातलं हे वातावरण हर्षदाच्या मनावर बिंबत गेलं. तिलाही कुस्ती खेळावीशी वाटू लागली. घरात ती वडील-भावांबरोबर कुस्तीचे धडे घेतच होती. वडिलांनी मुलांना कुस्ती खेळण्यासाठी तालमींना पाठवायला सुरुवात केली; पण भावांना त्यात आवडच वाटत नव्हती. दुसरीकडं, हर्षदाला मात्र कुस्तीत पुरेपुर रस वाटत होता. शेवटी तिनं वडिलांना विचारलंच ‘मला कुस्ती खेळायची आहे. तुमची इच्छा मी पूर्ण करेल. मुलं तर खेळत नाहीत म्हटल्यावर तिच्या वडिलांनीही हर्षदाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, पण परिसरात तिच्याशी खेळणार कोण? गावात मुलींसाठी तालमी नाही. भावांबरोबरच सराव व्हायचा. शेवटी त्यांनी तिला या आळंदीच्या व्यायामशाळेत पाठवलं. हर्षदानंं १७ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तर नुकतंच तिनं १९ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिसरं बक्षीस मिळवलं. आज हर्षदानं माळवाडी गावाचंंच नव्हे तर इंदापूरचं नाव मोठं केलंय. बोलणाºयांची तोंडं आता बंद झालीत.
हर्षदाच्या घरात किमान कुस्ती, पेहलवानी होती, पण जळगाव जिल्ह्याला महिलांच्या कुस्तीगटासाठी पहिलंच पदक तेही सुवर्णपदक मिळवून देणारी रुपाली महाजन हिची परिस्थिती एकदम वेगळी. रुपाली धरणगावची. रुपालीचे शेतमजुरी करणारे पालक आणि घरात प्रचंड हलाखी. रुपालीला खेळाची आवड होती. वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग होताच. शाळेतल्या शिक्षकांनी तालुक्याच्या शालेय स्पर्धेसाठी कुस्ती कोणी खेळणार का विचारलं. पण तिला खेळण्याचं तंत्र माहीत नव्हतं. गावात कुस्तीगीर होते. त्यामुळं तिनं अगदी लहान वयात कुस्त्या पाहिल्या होत्या. कसं खेळतात हे पाहून पाहूनच समजून घेतलं होतं. मग घरातच ती गाद्या टाकून भावंडांना घेऊन सराव करू लागली. वडीलही पोरीच्या जिद्दीला पाहून प्रोत्साहन देऊ लागले. तालुकास्तरावर पहिल्यांदाच खेळली अन् तिला सुवर्णपदक मिळालं. त्यानंतर विभागात आणि शालेय राज्य स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात तिनं प्रतिस्पर्धीला चीतपट करत सुवर्णपदक पटकावलं. रुपालीच्या या सर्वोत्कृष्ट खेळानं जळगाव जिल्ह्याला महिलांच्या कुस्तीगटासाठी पहिलं पदक मिळालं.
रुपाली म्हणते, माझी आई अडाणी. कुस्तीत मी बरं-वाईट कसंही खेळले तरी ती एकच म्हणते, रुपालीचा पयला नंबर आलाय. आईची माया रुपालीच्या डोळ्यात पाणी आणते. आणि त्या नजरेत आजवरचे कष्टही दिसतात.
भंडारा जिल्ह्यातील सुकडी या तालुक्यातील तुंगसर या गावची संगीता टेकाम. ही रानावनात राहणाºया संगीताकडं शक्ती खूप; पण कुस्तीचं तंत्र नव्हतं. संगीताचे आई- वडीलही शेती करून खाणारे. त्यांना कुस्ती वगैरे विषयी काही माहिती नाही. पण त्यांच्याच गावातील एका कुस्तीप्रेमी गृहस्थाने त्याच्या मुलीसोबत कुस्ती खेळताना संगीताला पाहिलं. संगीता त्यांना काका म्हणते. त्या काकांनीच तिच्यातील कुस्ती खेळाचा गुण हेरला. पण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेनं शाळेला पुरविलेल्या मॅटसाठी संगीताच्या शाळेचा नंबर लागला. शाळेत मॅट आली, पण ते शिकवणारं कोणीच नाही. मॅट तशीच पडून. मग एकमेकींच्या सोबतीनं पाच-सहा जणी त्यावर खेळायचे; पण त्याला कोणतेही तंत्र-नियम नव्हते. शेवटी या कुस्तीप्रेमी काकांनीच संगीताला पुण्यात पाठवलं. तिच्या कुस्तीसाठी येणारा खर्चही ते उचलत आहेत. संगीतानं कुस्ती खेळणं आणि असं गाव सोडून बाहेर पडणं या दोन्ही गोष्टी तिच्या वडिलांना पटलेलं नाही. पण आईची साथ आहे. संगीता आता कुस्ती गाजवतेय.
नागपूरची ओमेश्वरी बस्ती. ती सांगते, माझी भाषा मुली हसताहेत. तिची नागपुरी पद्धतीची हिंदी-मराठी संमिश्र भाषा. ती पुण्याकडच्या मुलींना नवीन. इथून तिची लढाई सुरू झाली. पण ओमेश्वरी तयारी करतेय. तिनं राष्ट्रीय स्तरावर कुस्तीखेळासाठी सलग तीनदा सहभाग नोंदविला आहे. सासवडची यशश्री मात्र कसलीही पार्श्वभूमी नसताना, खेळातच करिअर घडवायचं या इच्छेनेच कुस्तीत दाखल झाली. यशश्री शालेय अभ्यासात हुशार विद्यार्थिनी. शाळेत खेळाला महत्त्व नव्हतं. यशश्रीला आपण काहीतरी वेगळं करायला हवं असं वाटत होतं. मग तिला मुलीही कुस्ती खेळतात अशी माहिती झाली; पण सासवडमध्ये तर कुस्ती प्रशिक्षण किंवा तालीम नाही. तिनं वडिलांजवळ आपली इच्छा व्यक्त केली. मग त्यांनी अशा प्रकारे मुलींचं प्रशिक्षण केंद्र असतं का, अशी माहिती मिळवायला सुरुवात केली आणि त्यांना आळंदीचा हा रस्ता सापडला.
तासगावच्या स्मिता माळीपुढं तर कुस्तीसाठी संपूर्ण कुटुंबालाच स्थलांतरित होण्याचा पेचप्रसंग निर्माण झाला. स्मिताचे आजोबा कुस्तीगीर. वडीलही कुस्तीगीर; पण कुस्ती खेळतानाच वडिलांचा हात निखळला. मग त्यांनी शेती करायला सुरुवात केली. पण कुस्तीचं वेड काही केल्या जात नव्हतं. आपण नाही तर मुलांनी तरी खेळावं असं त्यांना वाटू लागलं. तिचे भाऊ कुस्ती खेळू लागले तशी स्मिताही त्यांच्यासोबत कुस्तीचे डाव खेळू लागली. तिचा बहरदार खेळ पाहून तिच्या वडिलांना वाटलं हिला रीतसर शिक्षण द्यावं. आता कुस्तीचं प्रशिक्षण केंद्र म्हटलं की कोल्हापूरच, हा विचार करून त्यांनी कोल्हापूर गाठलं. पण तिथं गेल्यानंतर तिथल्या तालीमवाल्यांनी सांगितलं, मुलीची राहण्याची सोय होणार नाही. संपूर्ण कुटुंबालाच यावं लागेल. आता ही एक मोठी पंचाइत होती. सारं घरदार खेळापायी कसं नेणार? कुस्तीतून स्मिताला बाहेर पडावं लागतंय अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिच्या कॉलेजच्या क्र ीडाशिक्षकांमुळे टळलं आणि आज तिही स्पर्धांमध्ये उत्तम कुस्ती खेळत आहे.
कुस्तीच्या खेळासाठी आपापली गावं, घरं सोडून मुली इथं राहायला आल्या होत्या. या व्यायामशाळेत सर्वात लहान मुलगी चौथी इयत्तेत, तर मोठ्या मुली महाविद्यालयाच्या दुसºया वर्षांत शिकणाºया; पण कुस्तीत नाव कमवायचं, हे स्वप्न सगळ्यांचं सारखंच आहे!
आणि झगडा, तो ही सारखाच आहे. मुलगी म्हणून क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणाºया समाजाशी लढणं आहेच.

गावोगावी कुस्ती खेळणाºया मुली, पण..
आज राज्यात अंदाजे तीनशेतरी मुली कुस्ती खेळत आहेत. मात्र सगळ्याच विखुरलेल्या आहेत. त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं होतं की गावा-गावांतून आलेल्या या मुलींना कुस्ती खेळायची कशाला? या प्रश्नापासूनच अडचणी सुरू होतात. सरावासाठी प्रतिस्पर्धी मुलीच नाहीत किंवा दोन गावांत एक एक मुलगी असली तरी, गावागावांत अंतर असल्यानं एकाच ठिकाणी येऊन सराव करणं अशक्य होतं. याबरोबरच अनेकींच्या गावात अद्यापही प्रशिक्षण, सुविधा, सुसज्ज मॅटचा अभाव आहे. काही जणींच्या शाळेतील शिक्षकांना आवड आहे म्हणून ते शिकवतात; मात्र त्यातही सातत्य नाही. स्पर्धेपुरतंच शिकवलं जातं. मात्र त्याला ना सरावाची ना योग्य तंत्राची जोड असते. याचा परिणाम खेळावर होणार असतो. काही ठिकाणी मुली नसल्यानं मुलांबरोबर सराव करावा लागतो. तर काहीवेळा नातेवाईकच कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचं मुलींच्या बोलण्यातून जाणवत होतं. कदाचित आजही कुस्तीला पुरुषांचा खेळ म्हणूनच अधिक पाहिलं जातं. त्यामुळेही कुस्ती पल्याडच्या सर्वसामान्य घरातले पालक मुलींना कुस्ती शिकवण्यास फारसे उत्सुक नसतात.


खुराक? तो कुठून येणार?
कुस्ती म्हणजे काही तोंडाची वाफ नाही. त्यासाठी कसून व्यायाम आणि दणकट आहार या गोष्टी असाव्याच लागतात. कुस्तीत लक्ष्य गाठण्यासाठी लक्षकेंद्र करण्याचीही जरुरी आहेच. त्यासाठी क्षणिक मोहांना मोडता घालण्याची तयारीही असावी लागतेच. मोबाइलने वेड्या झालेल्या अनेकींचे मोबाइल पहिले बंद झाले. मोबाइलवर वेळ घालवावा इतका वेळ तरी कुठे असतो म्हणा मुलींकडं. त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे साडेचार वाजता. सपाटे, जोर बैठका, डिप्स असा चांगला तासभर व्यायाम होतो. मग अंघोळी उरकून पुन्हा सहा वाजता मैदानावर धावणं, स्प्रिंट (जोरात धावणं) असे व्यायामप्रकार होतात. मग मैदानावरचा स्टॅमिना वाढवण्यासाठी, दम रोखून धरण्यासाठीचे काही वेगवान व्यायाम तसेच बास्केटबॉल, फुटबॉल हे खेळ ही व्यायाम म्हणून खेळले जातात. त्यानंतर थोडा वेळ कुस्तीचा प्रात्याक्षिक सराव केला जातो. ८.३० पर्यंत हे सगळं चालतं. मग दुपारी शाळा-महाविद्यालय करून संध्याकाळी पुन्हा ५.३० ते ८ यावेळी प्रत्यक्ष लढतींचा सराव केला जातो. कधी कमी वेळ, कधी जास्त वेळीच्या लढती लावल्या जातात.
अर्थातच त्यांना खुराकही भरपूर लागतो. नास्त्यामध्ये थंडाई- बदामाचे दूध, केळी, फळं, पौष्टिक लाडू, तीन वेळचं व्यवस्थित जेवण असा आहार या मुली घेतात. यातही परिस्थितीनुसार खुराक, हा ही प्रकार इथं डोकावतो. साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबात शेंगदाण्याचे लाडू परवडतात. त्यापेक्षा बरी परिस्थिती असणारे सुकामेव्याचे लाडू देतात, तर अतिशय उत्तम परिस्थिती असणारे थेट प्रोटिन्स देतात. दुधातून दोन चमचे प्रोटिन्स घेतले जाते; पण अशा प्रकारचा खुराक घेणारे अगदीच मोजके.
एकूणच खुराक, व्यायाम, मोबाइलबंदी, चमचमीत खाणं बंद, मैत्रिणींशी गप्पा बंद अशी इथली शिस्त.

कुस्ती वाढावी म्हणून
प्रयत्न करा, असं का म्हणतात प्रशिक्षक
जोग महाराज व्यायामशाळेचे दिनेश गुंड सांगतात, कुस्तीत यश मिळविणाºया मुलींना पाहून त्यांच्या गावातील इतरही कुटुंबातील पालक आता कुस्तीकडं सकारात्मकतेनं पाहत आहेत. याबाबत परभणीच्या डीएसएमएस कॉलेजचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय पंच बंकट यादव यांचं एक वेगळं निरीक्षण असं की, कुस्तीचा खेळ ज्यांच्या घरात आहे त्यांना कुस्ती शिकवायला फारसं अवघड जात नाही. ती मुलं-मुली चटकन गोष्टी आत्मसात करतात. इतर कुणीही प्रशिक्षणानंतर खेळतोच.
खरं तर आता राज्यातील काही गावांतील तालमींनी कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये परिवर्तन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं काही ठिकाणी मॅट पोहचवली आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी कुस्तीसाठी मेहनत घेतली जात आहे. गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने मुले आणि मुली कुस्ती खेळात चुणूक दाखवत असल्याने महाराष्ट्रात तर कुस्तीच्या खेळाला ‘अ’ दर्जा प्राप्त आहे. त्यासाठी काही प्रमाणात शासकीय हालचाली होत आहेत; मात्र त्याचे प्रमाण वाढण्याची गरज गुंड यांनी बोलून दाखवली.
‘शासकीय स्तरावर चांगल्या खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती दिलीही जाते; मात्र ती फारच नाममात्र असते. चांगल्या खेळाडूंसाठी शासनाने त्यांना सर्व स्तरावर मदत करण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे कुस्तीगीराचा एका महिन्याचा खुराकाचा खर्च १० हजारांपर्यंत जातो. आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतील खेळाडूंना हा खर्च परवडत नाही, मग ते कुस्तीगीर सर्व स्पर्धा आणि जत्रांमध्ये भाग घेत राहतो. याचा त्याच्या खेळावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट वजन. ग्रामीण भागात आजही वजन खूप असलं, बाह्यरूपानं पैलवान दिसलं म्हणजे खरा पैलवान अशी एक चुकीची समज आहे. नुसतंच भरमसाठ वजन असून कुस्तीगीर होता येत नाही, असं यादव सांगत होते. मुलींना पाहिलं तर खरोखरचं त्या अजिबात वजनदार दिसत नव्हत्या. मध्यम बांध्याच्या काटक दिसत होत्या. यादव पुढे म्हणाले, तुमच्याकडे वजन नव्हे 
तर सामर्थ्य असण्याची गरज असते. जागोजागीच्या या जुन्या कल्पनांना फाटा देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळेच सध्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनेच चांगले खेळाडू शोधून पुण्यातील मामासाहेब मोहोळ केंद्रात प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे, असं यादव सांगत होते.

जामखेडची माधुरी आणि कुस्ती

जामखेड येथील आरणगावच्या अर्णेश्वर लाल आखाडा येथेही कुस्तीगीर अयुब शेख हे मुला-मुलींना प्रशिक्षण देतात. त्यांनी नुकताच एक आखाडा बांधला आहे. अजून फारश्या सोयी नाहीत. तरीही कुस्तीच्या प्रेमापोटी शेख मुला-मुलींना प्रशिक्षण देत आहेत. इथं परिसरातील पाच-सहा जणी कुस्ती खेळायला येतात. शेख म्हणाले- माधुरी भोसले या मुलीनं दोनदा राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळवलं आहे. तसेच शालेय राज्यस्तरावर सुवर्णपदकही मिळवलंय. मात्र माधुरीचे आई-वडील सतत आजारी असतात. तिच्याकडं लक्ष देणारं असं कोणी नाही म्हटल्यावर अयुब शेख यांनीच या मुलीच्या शिक्षणाचाही भार उचलला. दीड वर्षापासून तर ती त्यांच्या आखाड्यातच राहत आहे. तिच्यासारख्या अन्य दोघीही तिथंच रहायला आहेत.
मात्र मुलींच्या कुस्तीकडं त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही आस्थेनं पाहत नाही. वजनाअभावी, दणकट शरीराअभावी या मुलींना हार पत्करावी लागते. याचं मुख्य कारण चांगलं खुराक न मिळणं. अर्थात, यात त्यांच्या पालकांचाही दोष नाही. मोलमजुरी करत जगणारे, शेती करणारे पालक असल्यानं त्यांना ते परवडत ही नाही. आखाड्यात त्यांना स्वयंपाक बनवण्याची सोय केलेली आहे. माधुरीसारख्या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचणाºया मुलीही शेवटी स्पर्धा करून स्वत:चं भागवत आहेत. आखाडे खेळून, कुस्ती जिंकून येणाºया रकमेतून गुजराण करत कुस्ती जगत आहेत. त्यांचे पालक फारतर त्यांचा सत्कार असतो तिथं येतात. याउपर त्यांनाही काही परवडत नाही. अशा मुलींना आर्थिक पाठबळ लाभलं तर त्या नक्कीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली चुणूक दाखवू शकतात. खेळानंतर पैसा नको, खेळ उत्तम खेळण्यासाठीही हवाच आहे.

( हिना मुक्त पत्रकार आहे. greenheena@gmail.com )

Web Title: Wrestling Left Sports? Live report from the wrestling girls' school that gives everyone a great reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.