झेरॉक्स मारताय?
By admin | Published: November 3, 2016 06:09 PM2016-11-03T18:09:03+5:302016-11-03T18:09:03+5:30
कॉलेजातले विद्यार्थी अनेकदा पुस्तकच्या पुस्तक झेरॉक्स मारतात..मात्र त्याविषयी आपल्या देशात खटला चालला, न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला, ते माहिती आहे का?
Next
>- ओंकार करंबेळकर
एखाद्या महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठामधून जाताना डोळ्यासमोर येतात ती जाडजूड पुस्तके हातात वागवत जाणारी मुले किंवा मुली. या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बाहेर असतात ती मोठमोठी फोटोकॉपी स्टेशन्स (झेरॉक्स सेंटर्स). दररोज नव्या ज्ञानाचा, माहितीचा होणारा विकास आणि बदलत्या शिक्षण विषयांमुळे जास्तीत जास्त संदर्भग्रंथांचा वापर या मुलांना करावा लागतो. बहुतांश वेळा ही पुस्तके परदेशात छापलेली किंवा परदेशी प्रकाशन संस्थांनी छापलेली असतात. त्यामुळे ती विकत घेणे अनेकांच्या आवाक्यात नसतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा संदर्भगं्रथांमधील सर्वच माहिती अभ्यासाला लागणार नसते आणि काही पुस्तकं आवडीची असली तरी ती संपूर्ण वाचायला वेळही नसतो. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी त्यातील महत्त्वाच्या भागाच्या छायाप्रती (मराठीत झेरॉक्स!!) काढून वाचण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच महाविद्यालयांच्या बाहेर फोटोकॉपीची दुकानं रांगेनं उभी असतात. आणि मुलंही प्लॅस्टिकच्या कव्हरमधील झेरॉक्स प्रती नाचवत तेथून फिरत असतात.
दिल्ली विद्यापीठही त्याला अपवाद नव्हतं.
देशाच्या राजधानीत असलं तरी या विद्यापीठात हा व्यवसाय सर्वात जास्त वेगाने सुरू होता. या विद्यापीठाच्याही आसपास तीनशे-चारशे झेरॉक्स यंत्रं त्यांचा टिपिकल हिरवा प्रकाश टाकत अखंड पुस्तकांच्या छायाप्रती तयार करत. पण विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये असणाऱ्या रामेश्वरी फोटोकॉपी शॉपने मात्र गेल्या चार वर्षात सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. चार झेरॉक्स मशीनसह गेली वीस वर्षे चालू असणारं हे दुकान अचानक मीडियाच्या बातम्यांचा आणि कोर्टातल्या चर्चांचा केंद्रबिंदू बनलं. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे विविध संदर्भग्रंथांमधून एकत्र करून हे केंद्र ‘कोर्स पॅक’ अशा नावाखाली फोटोकॉपी केलेले संच विकत होतं. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासक्रमाला अनुरूप असं साहित्य एकत्रित आणि संदर्भग्रंथ न शोधता आयतं मिळत होतं. नेमक्या याच छायाप्रतींच्या व्यवसायावर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि टायलर अँड फ्रान्सिस या परदेशी प्रकाशन संस्थांनी बोट ठेवलं आणि रामेश्वरी दुकानाला २०१२ साली कोर्टात खेचलं. या छायाप्रतीच्या कारखान्यामुळे आमच्या व्यवसायाचं नुकसान होत असून, कॉपीराईट कायद्याचाही भंग होत आहे, अशी भूमिका या संस्थांनी कोर्टात मांडली.
रामेश्वरी शॉप दिल्ली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं न्यायालयीन लढाईत उतरलं. आॅक्टोबर २०१२ मध्ये या दुकानावर तात्पुरती बंदीही घालण्यात आली. रामेश्वरीविरोधात जरी खटला सुरू असला तरी शेजारपाजारच्या इतर दुकानांनीही हा छायाप्रतींचा व्यवसाय बंद केला होता. अर्थात काही काळाने तो सुरूही केला.
चार वर्षे कोर्टात लढाई झाल्यावर यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने रामेश्वरीच्या बाजूने निकाल दिला आणि विद्यार्थी या छायाप्रतींचा वापर अभ्यासासाठी करत असून, त्याचा ते व्यावसायिक कारणासाठी वापर करत नाहीत असा निर्वाळा न्यायालयाने दिला. हा निकाल देताना न्यायाधीश राजीव सहाय एंडलॉ यांनी वापरलेले शब्द फारच महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले, कॉपीराईट कायदा काही दैवी किंवा निसर्गदत्त अधिकार नाही. शैक्षणिक साहित्याला कॉपीराईट कायदा १९५७ मध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे कारवाई केली जावी असं कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन करणारं कृत्य झालेलं नाही, असे सांगून न्यायाधीशांनी या खटल्यावर पडदा टाकला. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी जगभरातल्या इतर देशांमधील कायद्यांचाही अभ्यास केला. कारण निकालामध्ये न्यायाधीश म्हणाले, भारतीय कायद्याला भारताच्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीचा आणि साधनांच्या अडचणींचा विचार करावाच लागेल. या निर्णयामुळे देशभरात चर्चेचे नवे वादळ उठले आणि विद्यार्थ्यांच्या गरजांवर पुन्हा विचारविनिमय सुरू झाला.
रामेश्वरीची सुटका झाली असली तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या संदर्भसाहित्याचा प्रश्न उरतोच. छायाप्रतींचा वापर करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही दुसरा पर्याय नसतो. विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार छायाप्रती काढून त्यांचा अभ्यासासाठी वापर करतात. जर कॉपीराईट कायद्याचा बागुलबोवा करून त्यांना रोखलं तर भारतासारख्या आता कुठं ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली होत असलेल्या देशातील गरीब मुलांनी कोणाची मदत घ्यायची हा प्रश्न येतोच. त्याचप्रमाणे एखाद्या दुकानावर कारवाई केली तर मुले दुसरे मार्ग, दुसरे पर्याय स्वीकारणार नाहीत असंही नाही.
महानगरांमधील असो वा लहान गावातील विद्यार्थ्यांना सगळी पुस्तकं घेणं शक्य नसतं. अभ्यासक्रमांना भरभक्कम फी दिल्यावर ही महागडी पुस्तके आम्ही कशी घ्यायची, असा प्रश्नच त्यांच्यासमोर असतो.
पुस्तकांच्या झेरॉक्स मारणं, हे आपल्याला इतकं सोपं वाटतं. पण त्यावरून देशात खटले चालतात, त्यावर कोर्ट सामाजिक भाष्य करतं हे तरी आपल्याला माहिती असावंच..
अभ्यासाची पेपरबॅक पुस्तकं काढा..
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे अभ्यासक्रमाच्या नोट्सचा. महाविद्यालयातून मिळणारं साहित्य हे बऱ्याचदा पुरेसं नसतं. फक्त नोट्सवर अवलंबून राहून चालत नाही. त्यामुळे साहजिकच पुस्तकं घ्यावी लागतात. मात्र पुस्तकांची, त्यातही जर परदेशी लेखकांची, अभ्यासकांची पुस्तकं असतील तर त्यांची किंमत तुलनेने जास्त असते. मग ग्रंथालयातून कोणा एकाने पुस्तके घेणे आणि त्याची झेरॉक्स करून घेणे. अनेकदा ग्रंथालयातूनही पुस्तक न मिळाल्यास आम्ही चार किंवा पाच जण मिळून पुस्तक विकत घ्यायचो. कारण एकाला पुस्तक विकत घेणं परवडणारं नसतं. परिणामी सबंध पुस्तक किंवा त्यातील काही भागाची झेरॉक्स काढणे हाच मार्ग असतो. पण अनेक इंग्रजी पुस्तकांच्या पेपरबॅक आणि हार्डबाउंड अशा दोन्ही प्रकारच्या आवृत्त्या निघतात. पेपरबॅक आवृत्ती ही हार्डबाउंड आवृत्तीपेक्षा स्वस्त असते. तशा आवृत्त्या अभ्यासी पुस्तकांच्याही निघायला हव्यात.
- पार्थ कपोले राज्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी