येडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:14 PM2018-01-04T12:14:23+5:302018-01-04T12:14:28+5:30
एकदम चुपचाप बसणारी, नाकावर बसल्या माशीला सुद्धा घाबरत घाबरत उठ गं बाई म्हणणारी राखी सावंत एकदम बोल्ड आणि मुहफट झाली. जिथं तोंड उघडताना मारामार; तिथं जाळ आला माझ्या जिभेवर तो का..? कारण अठरा वर्षांची होताच मी घरातून पळाले.
- राखी सावंत
पळाला..
स्टार झाला. तमुक पळाला स्टार झाला.
असं पळून माणसं स्टार झाली असती तर आपला सगळा बधिर समाज पळत नसता सुटला. (पण मरो ते, मला त्याच्याशी काय करायचं..)
मी पळाले घरातून. पळण्याशिवाय पर्यायच नव्हता, किती दिवस बापाच्या हातचा मार खायचा. ती तसली ‘नास्की-कुस्की-सडकी’ जिंदगी लाथाडायचीच होती मला. पळाले. पळताना घरातूनच थोडे पैसेही घेतले होते. झुठ कशाला बोला, राखी सावंत तसंही कधी झुठ बोलत नाही, जे केलं त्याचा कधीच पस्तावा करत नाही, लपवत नाही. डंके की चोट पर जिंदगी जिने का हौसला है, म्हणून तर राखी राखी सावंत आहे आज..!
तर पळाले. मैत्रिणीच्या घरी राहिले. मग चार-दोन ठिकाणी पीजी राहिले. तिकडे माझा पोलीस बाप आणि त्याची माणसं कुत्र्यासारखी मला हुडकत फिरत होती. पोरगी घरातून पळाली म्हणजे इज्जतच गेली ना, तोंडाला काळं फासलं पोरीनं. समाजात नाक कापलं.
घरातून पळाल्यावर पहिल्यांदा कळली पोटाची भूक.
मुंबईत वडापाव खाल्ला तर ती भागते, पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा..?
मला तर नाचण्यापलीकडे काहीच येत नव्हतं.
अॅक्टिंगबिक्टिंग कशाशी खातात हेच माहिती नव्हतं. त्याकाळी दूरदर्शनवर एक रंगारंग नावाचा कार्यक्रम असायचा. त्यात मला पहिलं काम मिळालं. स्टुडिओत गेले तर त्यांनी नाचायला सांगायचं सोडून माझ्या हातात एक कागद दिला. म्हणे, हे डायलॉग वाच.. म्हण.. अॅक्टिंग कर.
मला तर वाचताही येत नव्हतं. अॅक्टिंग कशाशी खाणार..?
तेव्हा मला कळलं, आपल्याला तर काहीच येत नाही. या फिल्म इंडस्ट्रीत माझ्यासारखीला कोण उभं करणार होतं..? मी अशी पोरगी होते जी दिसायला सुंदर नाही, अॅक्टिंगफिक्टिंग काय येत नाही, मागं-पुढं-डोक्यावर कुणी गॉडफादर नाही, त्याचा हात-पाय काहीच नाही.
तिथून सुरुवात झाली सांगा; पण राखी डरली नाही. एक-दोन मैत्रिणी स्टेज म्हणजे नाटकं करायच्या. मी त्यांच्याबरोबर जाऊ लागले. बॅकस्टेज काम करू लागले. मराठी-हिंंदी-गुजराथी मिळेल त्या नाटकात स्टेज-बॅकस्टेज केलं. तिथं कळलं अॅक्टिंग काय असतं, अभिनय कशाला म्हणतात. राखी सावंतने कधीकाळी जीव तोडून स्टेज केलंय हे कुणाला माहिती आहे आज..?
पण मी करायची, एकतर मला पहिल्यांदाच एक नवीन जग कळत होतं आणि दुसरं म्हणजे पैसे. दिवसाला पाचशे रुपये मिळायचे. ते पैसे आणि जगाचा अनुभव यानं राखी सावंतच बदलून गेली.
एकदम चुपचाप बसणारी, नाकावर बसल्या माशीला सुद्धा घाबरत घाबरत उठ गं बाई म्हणणारी राखी सावंत एकदम बोल्ड आणि मुहफट झाली. जिथं तोंड उघडायचं नाही तिथं जाळ आला माझ्या जिभेवर तो का..?
समाजानं तिला तसं जगायला भाग पाडलं म्हणून!
मुळात राखी सावंत ‘येडी’ आहे..
आणि ती ‘येडी’ राहिलेलीच बरी..
(लोकमत दीपोत्सव-२०१२ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संपादित अंश !)