फ्रान्समधली यलो वेस्ट मुव्हमेंट- तरुण म्हणतात 'कामाचं बोला!'
By meghana.dhoke | Published: December 19, 2019 07:59 AM2019-12-19T07:59:00+5:302019-12-19T08:00:12+5:30
जिम्मी सांगतो,‘या आंदोलनात अनेक तरुणांनी सहभागी व्हावं, आपल्या हक्कांसाठी भांडावं म्हणून मी त्यांची भाषा बोलतो आहे! आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही एवढंच माझं रॅप त्यांना सांगतं आहे.!’
-मेघना ढोके / कलीम अजीम
एरव्ही रॅप, हिपहॉप हे संगीतप्रकार बंडखोरीचेच मानले जातात. तरुण मनातल्या आक्रोशाला, धगधगत्या आगीला हे हिपहॉपर्स आकार देतात.
फ्रान्सच्या शहरी संस्कृतीला आकार देण्यातही हिपहॉपचा मोठा वाटा आहेच. आता मात्र हेच हिपहॉप आणि रॅप एका नव्या विद्रोहाची पायाभरणी करत आहे.
त्याचं नाव आहे, फ्रान्समधली यलो वेस्ट मुव्हमेंट.
जिम्मी नावाचा 29 वर्षाचा रॅपर आहे. अत्यंत लोकप्रिय. त्याचे रॅप सॉँग अलीकडे यलो वेस्ट मुव्हमेंटचा आवाज बनलेत. त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकांच्या ओठी त्याचे शब्द आहेत. एवढंच काय, ज्यांना रॅप आवडत नाही, त्यांनाही जिमीचे शब्द आपले वाटत आहेत, कारण जिम्मी त्यांच्या भाषेत त्यांचे दर्द मांडतोय आणि हक्कांचं बोला म्हणत व्यवस्थेला आव्हान देतो आहे.
जिम्मी सांगतो,‘यलो वेस्ट चळवळीत अनेक तरुणांनी सहभागी व्हावं, आपल्या हक्कांसाठी भांडावं म्हणून मी त्यांची भाषा बोलतो, ते बोलतात तेच शब्द रॅपमध्ये वापरतो. आता थांबायचं नाही, घाबरायचं नाही एवढंच माझं रॅप त्यांना सांगतं आहे.!’
या आता थांबायचं नाही या भावनेतूनच 2019 या वर्षभरात फ्रान्स सरकारविरोधात विविध आंदोलनं झाली. ‘यलो वेस्ट मुव्हमेंट’ हे एक सर्वात मोठं आंदोलन. 2018 डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात जगातील सर्व तरु णाई न्यू इअर सेलिब्रेशनच्या तयारीत होती. तेव्हा फ्रान्समधली तरु णाई इमॅनूअल मेक्र ॉ सरकारच्या निर्णयाविरोधात रस्ते अडवत होती. येलो जॅकेट परिधान करून हजारो तरु णांनी संपूर्ण पॅरीस शहर वेठीस धरलं होतं. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि 48 प्रकारच्या कररचनेतील वाढीविरोधात हे आंदोलन होतं.
नोव्हेंबरात हे आंदोलन सुरू झालं, डिसेंबर उजाडता उजाडता त्यानं रौद्र रूप धारण केलं. हळूहळू करत फ्रान्सची जनता एकजूट दाखवत सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. आंदोलनामुळे रस्ते, शाळा, महाविद्यालयं, व्यावसायिक प्रतिष्ठानं, शॉपिंग मॉल सगळे बंद झाले. एकवेळ परिस्थिती अशी आली की सरकार आणीबाणी जाहीर करण्याच्या तयारीत होतं. फ्रेंच जनता सरकारला वेठीस धरून जाचक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत होती; पण सरकार काही मागे हटायला तयार नव्हते. परिणामी जनतेचा आक्र ोश वाढत राहिला व ‘यलो जॅकेट मुव्हमेंट’आकाराला आली.
ऑक्टोबरला चेंज ओआरजीवर इंधन दरवाढीविरोधात एक निवेदन आलं. सामाजिक कार्यकत्र्या सीन-एट-मर्ने यांनी हे निवेदन पोस्ट केलं होतं. तब्बल 3 लाख लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या. कुणीतरी हे निवेदन सोशल मीडियावर शेअर करीत म्हटले की 17 नोव्हेंबरला देशभरातील सर्व रस्ते बंद करून विरोध प्रदर्शन करावं. हा मेसेज व्हायरल झाला. आवाहनानंतर काहीजण ट्रॅफिक पोलीस वापरत असलेला पिवळा रेडियम जॅकेट घालून रस्त्यावर उतरले. लोकांचं लक्ष आपल्याकडे वळावे यासाठी पिवळं जॅकेट घालण्यात आलं. हे जॅकेट लांबून चमकत असल्यानं ते सहज लोकांचे लक्ष वेधून घ्यायचं. लक्ष वेधण्याची ही शक्कल कामाला आली व आंदोलनाची व्याप्ती देशभरात वाढली. आणि त्यातून पिवळं जॅकेट ही या आंदोलनाची ओळख बनली.
यलो वेस्ट आंदोलनाची तयारीही आंदोलकांनी केली होती. आंदोलकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रस्त्यावर आणले गेले होते. अश्रुधूर, पाण्य़ाचा मारा, रबराच्या गोळ्या आदींपासून बचाव करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही अनेकांनी घेतलं होतं. अनेक आंदोलकांनी डोक्यात हेल्मेट व चेहर्यावर स्टोल वापरला होता. इतकेच नाही तर प्रत्येकाने हातात जे येईल ती वस्तू हत्यार म्हणून वापरली.
फ्रान्समध्ये मागच्या काही आंदोलनात यलो जॅकेट सांकेतिक पद्धतीने वापरण्यात आला होता; पण यावेळी हे जॅकेट मोठय़ा आंदोलनाचं प्रतीक ठरलं. तब्बल 84 हजार आंदोलकांनी यलो वेस्ट परिधान करून सरकारच्या नाकीनव आणले. तज्ज्ञांच्या मते, गेल्या 50 वर्षात फ्रान्समध्ये अशा प्रकारचे आंदोलन झालेलं नाही. 1871 सालच्य़ा पॅरीस कम्युननंतर 1968 साली विद्याथ्र्यानी जाचक नियमाविरोधात अशाच प्रकारचं आंदोलन फ्रान्समध्ये केलं होतं. त्यानंतर हेच आंदोलन पेटलं. आजही जगाच्या इतिहासातल फार मोठं आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं जातं आहे.
आंदोलनाचा भर पाहता सरकारने इंधन दरवाढ मागे घेतली; पण अन्य मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलनं सुरूच होती. वाढते कर, वाहनांच्या गतीवर नियंत्रण, आर्थिक सुधारणेच्या नावाने कराचा वाढता बोजा, पेन्शन योजना इत्यादी कारणांनी फ्रान्स पेटत राहिलं.
आणि आता तर हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे.