तरुण मुलांच्या जगात हॉट फेवरिट असलेले योगा स्टुडिंओ पाहिलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:46 PM2018-06-21T13:46:17+5:302018-06-21T13:46:17+5:30

जिम बडींचा हात धरून जिम मारणारे तरुण मुलं-मुली. त्यांच्या जगात एक शब्द नव्यानं दाखल झालाय योगा स्टुडिओ. तरुणांना योगाभ्यासाच्या प्रेमात पाडणारे हे योगा स्टुडिओ नक्की दिसतात कसे? शिकवतात काय?

yoga studio : new culture in the young urban world | तरुण मुलांच्या जगात हॉट फेवरिट असलेले योगा स्टुडिंओ पाहिलेत का?

तरुण मुलांच्या जगात हॉट फेवरिट असलेले योगा स्टुडिंओ पाहिलेत का?

Next
ठळक मुद्दे कुठल्याही योगा स्टुडिओत जा.  रंगसंगती, इंटिरिअर, आरसे, शिल्प या सगळ्यातून एक खास वातावरण निर्मिती केली जाते. उजेड, प्रकाश, सावल्या यांचाही उत्तम मेळ घातला जातो.

-स्नेहा मोरे

वेळ सकाळी पावणेआठची..
ती- अरे तू आज येत नाहीयेस का? 
तो- नाही गं. कंटाळा आलाय.
ती- शेडय़ूल डिस्टर्ब करत जाऊ नकोस. योगा मस्ट, यू नो.
-मुंबईत घडय़ाळाला बांधलेल्या तरुण मुला-मुलींच्या आयुष्याची सुरुवातही अलीकडे अशी व्हॉट्सपीय चर्चेनं होते. तसे हे डायलॉग नवीन नाही. एकमेकांना असं मानसिकदृष्टय़ा ढकलत व्यायाम करायला भाग पाडणंही नवीन नाही. ‘जिम बडीं’चं कामच ते. सगळं टोळकंच भल्या सकाळी जिमला जातं किंवा सायंकाळी जिम मारतं हे काही तसं नवीन नाही. पण, हा डायलॉगमधला एक शब्द मात्र आताशा बदलायला लागलाय. ही वरची चर्चा नीट वाचा, त्यात योगा मस्ट म्हटलंय. आणि बदल आहे तो हा. गेल्या काही वर्षात एक नवीन ट्रेण्ड तरुण-तरुणींमध्येही रुजताना दिसतोय. तारुण्याच्या उत्साहाला आणि चकाचक वातावरणाच्या प्रेमाला शोभेल असे ‘योग स्टुडिओ’ तयार होऊ लागलेत. आणि ‘जिम’कडे वळणारी तरुण पाउलं आता योगा स्टुडिओकडे जाताना दिसताहेत.
काय आहेत हे योगा स्टुडिओ? कसे दिसतात? तरुण मुलांमध्ये त्यांचं आकर्षण का झालंय? किंवा तारुण्याला व्यायामाच्या प्रेमात पाडता येईल असं काय आहे या जागेत?


या प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि योगासनं नियमित करणार्‍या तरुण मुला-मुलींशी गप्पा मारायच्या म्हणून एक योगा स्टुडिओ गाठला. 
दक्षिण मुंबईतल्या हायपोफ्राइल चर्चगेट परिसरात ‘वेल अ‍ॅण्ड ट्रीम’ नावाचा एक योगा स्टुडिओ आहे, तिथं पोहोचलो. आत गेलो तर एक हायफाय मुलगी चौकशीसाठी आलेलीच होती. इंग्रजीतच संवाद सुरू होता. किती दिवसांत वजन कमी होईल वगैरे ती विचारत होती. माहिती देणाराही वारंवार सांगत होता, असं झटपट काही नाही. तीन महिने नियमित आसनं केली, रूटीन पाळलं तर बदल दिसू लागेल.
त्यांची चर्चा ऐकतच आवतीभोवती पाहिलं तर आवतीभोवती सगळ्या भिंती आरशांच्याच. सौम्य रंगसंगती, अत्यंत शांत वातावरणं, उन्हाचे कवडसे आत येतील अशी खिडकीची उत्तम रचना. तिथं चाललेला ऊनप्रकाशाचा खेळ. अत्यंत शिस्तबद्ध आसनं करणारी तरुण मुलं.  या योगा स्टुडिओचे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक राम योगी भेटले. त्यांना योगासनांच्या या स्टुडिओविषयी विचारलं. मुळात स्टुडिओ म्हणजे काय, याला स्टुडिओ का म्हणतात ते सांगा म्हटलं. तर ते सांगतात, ‘गेल्या काही वर्षापासून वजनाच्या समस्यांनी ग्रासलेली अनेक तरुण मंडळी या स्टुिडओमध्ये योगासनांच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतात. आठ तासांची डय़ुटी, शीफ्टमधलं काम, कॉलेजचा भरपूर अभ्यास आणि स्वतर्‍च्या दिसण्याविषयी, लवचिक शरीराविषयी वाढलेली जागरुकता आणि फिट राहण्याचा नवा ट्रेण्ड. या सार्‍यांसाठीच आता तरुण मुलं-मुलीही योगासनं करतात. आपल्या ‘बिझी’ शेडय़ूलमधून वेळ काढत 22 ते 30 या वयोगटातले तरुण-तरुणी या स्टुडिओत येताहेत. आपल्या शरीरासह मनाच्या स्वास्थ्याचाही विचार करताहेत.’
यापैकी अनेकांनी पूर्वी जिम केलेलं असतं मग आता ते योगाची निवड का करतात, असं विचारल्यावर योगी सांगतात, जिममध्ये केवळ शारीरिक व्यायामावर भर दिला जातो. शिवाय जिममध्ये जाणं बंद झालं की व्यायाम थांबतो. घरच्या घरीही व्यायाम करणं बंद होतं, मग लगेच वजनाचा काटा फिरतो. योगासनं म्हणजे नुस्ता व्यायाम नव्हे. त्यामुळे ‘व्यायाम’ आणि ‘योग’ यातला फरक हळूहळू तरुण मुलांनाही समजू लागलाय. योगासनं करण्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही, शरीर आणि मन यांचा संवाद घडवण्याचाही ‘बेस्ट फाम्यरुला’ आहे. आपल्या देशातील सामान्यांना योगाचं महत्त्व काहीसे उशिरा उमगलं. ‘योग’ विदेशात गेला, त्यांनी तो स्वीकारला आणि आणि मग त्याचा ‘योगा’ होऊन भारतात आला तेव्हा कुठं आता इथल्या तारुण्याला त्यातली ताकद उमगायला लागली आहे.’


आम्ही बोलत होतो, तोवर दुपार उलटून गेली. साधारण दुपारी अडीचच्या सुमारास स्टुडिओत तरुण गृहिणींची लगबग दिसू लागली. त्यातल्या काही झुम्बा क्लाससाठी आल्या होत्या. काहींनी फॅट बर्निग योगासाठी प्रवेश घेतला होता. खास वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी आताशा असे नवनव्या पद्धतीने मेळ घालत योगासनं शिकवली जाऊ लागली आहेत. त्यात फॅट बर्निग योगा, एरॉबिक्स, स्पोर्ट्स स्ट्रेचिंग, विन्यासा योगा, हॉट बूट कॅम्प योगा या प्रकारांचा समावेश आहे. या सगळ्यांचं प्रशिक्षण देणारी जागा म्हणजे हे योग स्टुडिओ. या स्टुडिओत व्यायाम आणि योग यांचा मेळ घातला जातो. मनर्‍शांतीसाठी श्वासांचे व्यायामही करवले जातात.  
एकीकडे नव्या पॅकेजमध्ये घालून सादर केलेली योगासनं ही या योगा स्टुडिओची वैशिष्टय़े. अजून एक दुसरं कारण म्हणजे त्यांची मांडणी, स्ट्रक्टर आणि लूक. या स्टुडिओची उभारणी करताना वेगळा दृष्टिकोन ठेवला जातो. तरुण मुलांना रुचेल असं इथलं प्रसन्न वातावरण असतं. कुठल्याही योगा स्टुडिओत जा.  रंगसंगती, इंटिरिअर, आरसे, शिल्प या सगळ्यातून एक खास वातावरण निर्मिती केली जाते. उजेड, प्रकाश, सावल्या यांचाही उत्तम मेळ घातला जातो.
लोअर परळच्या ‘योग कर्मा’ स्टुडिओतही साधारण चित्र असंच.  या स्टुडिओच्या आवारात अनेक  शिल्पं आहेत. काही पेटिंग्सही भिंतीला लावलेली दिसतात. ती इतकी सुंदर की त्यांच्याकडे पाहत राहावं. या स्टुडिओत प्रशिक्षक डेव्हीड रॉन भेटले. त्याचवेळी एक 20 वर्षाचा मुलगा त्यांना भेटायला आला, आजच वर्कआउट शेडय़ूल काय आहे, हे त्यानं आपल्या डायरीत नोंद केलं आणि मग वर्कआउटसाठी रेडी व्हायला निघून गेला. तो निघून गेल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट डेव्हीड यांनी सांगितली. गेली दीड वर्ष हा मुलगा डिप्रेशनशी लढतोय. औषधं घेतोय. मात्र अलीकडे नियमित योग करू लागला. त्याचीही त्याला या सगळ्या नैराश्यातून बाहेर पडायला मदत झाली. त्या मुलाशी बोलता येईल का, अशी विनंती केली. तो तरुणही नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलला. म्हणाला, ‘कुटुंबातील एका घटनेचा मी खूप धक्का घेतला, खूप औषधं करून झाली अजूनही उपचार सुरू आहेत. महाविद्यालयातील एका प्राध्यापकानं मला नियमित योग करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मी खूप टाळाटाळ केली की ‘ये मेरे बस की बात नही’ मात्र त्यांनी हट्ट धरला आणि सोबतच घेऊन गेले. 3-4 दिवस कसंबसं  गलो. बरं वाटलं, काहीतरी बदलत होतं. हीच बदलाची नांदी आहे, असं समजून मी ठरवलं योग नियमित करायचा. आता नैराश्यावस्थेतून 60 टक्के बाहेर पडलोय. या पुढे ‘योगा’ हेच माझं गुणकारी औषध आहे असं वाटतंय’. तो प्रसन्न चेहर्‍यानं सांगत होता. 
योगा स्टुडिओमध्ये अनेक तरुण चेहरे दिसले. डेव्हीड सांगतात, अनेकजण फक्त वजन कमी करायचं म्हणूनच येतात. मात्र योग तेवढय़पुरताच मर्यादित नाही हे त्यांना समजून सांगावं लागतं. मन आणि शरीराच्या स्वास्थ्याच्या तरुणांच्याही तक्रारी वाढत आहे. त्यांना महत्त्वही कळेल या योगाभ्यासाचं. येत्या काही वर्षात या स्टुडिओची संख्या नव्हे तर गरज वाढेल. कारण आपला दैनंदिन दिनक्रम हा आणखीनच चौकटीतला होतोय. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होऊन मनावरील ताणात अधिकाधिक भर पडतेय. त्यामुळे अशा परिस्थितीत या दोहोंचं स्वास्थ्य जपायचं तर योग नक्की मदत करेल. अर्थात त्यातही सातत्य, सामथ्र्य आणि संयम असणं गरजेचं आहेच.’
ते सातत्य जपण्याचा प्रय} योगा स्टुडिओत येणारे अनेकजण करताना दिसतात. नव्या लाइफस्टाइलने जगणं शिकवणार्‍या, घडवणार्‍या अनेक जागा निर्माण केल्या. त्यातलेच हे योगा स्टुडिओ. या जागा कमर्शियल असल्या तरी त्यात निर्माण होणारी दोस्तीची नाती मात्र खरीच असतात.


( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत आरोग्य वार्ताहर आहे)े
moresneha305@gmail.com

Web Title: yoga studio : new culture in the young urban world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.