तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

By Admin | Published: January 8, 2015 08:34 PM2015-01-08T20:34:29+5:302015-01-08T20:34:29+5:30

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर,

You and me? Why did our young couple say that our breakup was due to mobile phones? | तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

googlenewsNext
>‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर, अनोळखी, पुन्हा नव्यानं समजून घेऊ स्वत:ला, हा ‘अतीओळखीचा’ बोजा उतरवून ठेवता येईल का आपल्याला?’
-असं मी कितीदा विचारतो तिला ; खरंतर तर तिलाही तसंच वाटतं! पण ती म्हणते, ‘बरं झालं ना, आपल्याला एकमेकांचा खरा चेहरा तरी दाखवला या मोबाईलनं, या रोमॅण्टिसिझमपेक्षा मी हे वास्तव स्वीकारीन की नाहीयोत आपण एकमेकांना साजेसे.’
मला प्रश्न पडतो की, मग असं आमच्यात काय होतं की आम्ही एकमेकांना इतके आवडलो होतो की, गेले दोन वर्षे आम्ही एकमेकांशी रात्रंदिवस बोलतच सुटलो होतो, आणि आता शब्दांसह भावनांचा एकदम दुष्काळ पडला.’
अजिंक्या नावाच्या एका मित्रानं पाठवलेली ही ईमेल.
खरंतर अजिंक्यानं सांगितलं त्याहून वेगळं अनेक पत्रात काहीच नव्हतं. कळकळून लिहिलेल्या अनेक कहाण्या, वाचताना अस्वस्थ करणार्‍या. अनेक पत्रं वाचताना वाटलं की, आपण एखाद्या सुंदर लव्हस्टोरीची काही पानं वाचतो आहोत आणि मग एकदम व्हिलनची एण्ट्री व्हावी आणि त्यानं त्या लव्हबडर्सला एकदम शत्रू बनवावं तशी कहाणी टर्न मारते.
पण व्हिलन तरी कसं म्हणणार मोबाईलला, कारण त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, ती वाढ एकदम कॅन्सरस झाली, त्याचा दोष त्याला द्यायचा?
पण ही बहुतांश पत्रं मात्र आपल्या मोबाईलला म्हणजेच पर्यायानं आपल्या मोबाईलवरच्या बोलण्याला आणि त्या मोबाईलमुळे झालेल्या विश्‍वासघातालाच सारा दोष देतात.
त्या दोषांच्या कारणांवरची पुटं जरा  खरवडून काढली की दिसतात, या तरुण जोडप्यांनीच सांगितलेली ब्रेकपची खरी कारणं, आणि झालेला घोळ.
१)अनेकांना एकमेकांशी बोलण्याची ‘सवय’ लागते. व्यसनी माणसाचं होतं तसंच, मोबाईल अँडिक्शन, आपण एकटे नाही, कुणीतरी सोबत आहे, ‘आपलं’ आहे, या भावनेनं ते बोलत राहतात.भांडणं झाली तरी बोलतात, कारण ती भांडणसुद्धा आपण ‘एकाकी’ नाही, आपल्या जगण्यात काहीतरी मोठं आहे ही भावना पुरवतात. पण एकाचंच असं होत असेल तर दुसरा त्या नात्याला विटतो.
२) अनेकांना वाटतं, भेटायचं कशाला? आपण तासंतास फोनवर बोलतो, मेसेज, व्हॉट्सअँप करतो, भेटून आणि वेगळं काय बोलणार? आणि भेटलं की, फोनवर बोलणार्‍या व्यक्तीपेक्षा प्रत्यक्षातला माणूस वेगळा वाटतो, काही बोलणंच होत नाही, परस्परांविषयी आकर्षण वाटत नाही.असलेली ओढ कमी होते.
३)इतर मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी असलेली जवळीक, कुणातरी एका मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी असलेली ओढ आपल्या नात्यात अडसर दोघांपैकी एकाला ( प्रसंगी दोघांना) वाटू लागतो. ती नाती तोडण्यासाठी दबाव टाकला जातो, इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं, त्यातून भांडणं, अबोले, स्वातंत्र्यावर आक्रमण ही भावना आणि मग नको होतं नातं.
४) चोवीस तास कनेक्टेड असल्यानं अनेकजण खूप पझेसिव्ह होतात. इतके की दुसर्‍यानं श्‍वासही घेतला तर आपल्याला सांगावं असा विचार करतात. त्या पझेसिव्हनेसचा आणि चोवीत तास आपल्यावर वॉच आहे, या भावनेचा त्रास होऊ लागतो.
५) आता तर अनेकजण रोज काय घालायचं, सिनेमाला जाताना काय, स्वयंपाक काय केला इथपासून ते आपल्या इंटिमेट क्षणांपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो किंवा क्लिप काढून एकमेकांबरोबर शेअर करतात, भांडणं वाढली की ते सारं घरच्यांना दाखवीन किंवा व्हायरल करीन म्हणून धमक्याही देतात. न उरलेलं नातं खेचत राहतात.

Web Title: You and me? Why did our young couple say that our breakup was due to mobile phones?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.