'पुरुष'पणाकडे सतत ढकलले जाणारे मुलगे, या मुलग्यांचे रक्षण कोण करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:00 AM2020-03-05T08:00:00+5:302020-03-05T08:00:07+5:30
एक मोठा समूह आहे खेडय़ापाडय़ातल्या मुलांचा. त्यांना खूप खूप प्रश्न आहेत, इनसिक्युरिटीज आहेत, मनात खूप गोंधळ आहेत, अर्धवट माहितीचा महासागर आहे. या गोंधळाचा, कमी झालेल्या आत्मविश्वासाचा समाज तोडणार्या कामासाठी वापर करून घेणार्या शक्ती बक्कळ आहेत. आणि मुलांना मोकळेपणानं बोलता येईल अशा जागा फारच कमी. शिक्के न मारता आपल्याला कोणी ऐकून घेईल, दिशा शोधायला मदत करेल अशी माणसं त्यांना आजूबाजूला दिसत नाहीत. त्या मुलग्यांसाठी काम करायला हवं.
- ओजस सु. वि.
वर्धा हे तसं शांत गाव. राज्याच्या उपराजधानीच्या इतक्या जवळ असूनही इथे खूप मोठे मोर्चे, आंदोलनं होत नाहीत. देशात मोठय़ा घटना घडल्या तर फार फार तर गांधी पुतळा किंवा आंबेडकर पुतळा इथे पन्नासेक लोकांच्या प्रार्थनासभा होतात; पण हिंगणघाटमध्ये घडलेल्या जळीत घटनेमुळे वर्धेकर खूप हादरून गेले होते. काही महिला संघटनांनी निषेध मोर्चाचे आवाहन करताच हजारोच्या संख्येने बायका, शाळकरी मूल-मुली, तरुण-तरु णी, पुरु ष रस्त्यावर उतरले. सुमारे दीड-दोन किलोमीटर लांबीचा भरगच्च मोर्चा दुपारच्या टळटळीत उन्हात निघाला होता. त्या घटनेत बळी पडलेली मुलगी आणि गुन्हा केलेला मुलगा दोघेही आपल्यासारख्या सामान्य कुटुंबवत्सल घरातले. दोन्हीकडचे जगण्याचे संघर्ष सर्वसामान्य. मग आपल्यासारख्या घरातली एक हुन्नरी आणि शांत मुलगी बळी पडते आणि तिला जाळणारा मुलगाही आपल्यासारख्याच एका घरातून निघतो, हे वास्तव संवेदनशील मनाला चटका लावणारं होतं.
हिंगणघाटमध्ये घडलेली घटना हिमनगाचं वरचं टोक होती.
त्याच्या काही दिवस आधीही हैदराबादमध्ये घटना घडली होती.
आत्ताच्या दिल्लीमधल्या दंगलीची चित्रंही समोर आहेतच.
सध्या शाळकरी वयापासून तिशीपर्यंतच्या मुलग्यांनी केलेल्या छोटय़ा-मोठय़ा हिंसक घटना सारख्या समोर येत आहेत. दंगलीमध्ये दगडगोटे उचलणारे हात आता आणखी आणखी कोवळे होत चाललेत. तरीही ही हिमनगाची वरची एक सप्तमांशच बाजू; पण आपल्याला न दिसणार्या आतल्या बाजूत काय काय घडतंय? त्या मुलांच्या हाताला काम आणि डोक्याला खुराक नसणं हे व्यवस्थेचं अपयश आहे. त्यासाठी वेगळं काम करायला हवं; पण या आपल्याच मुलांच्या मनात काय चाललंय ते तरी आपल्याला पुरेसं कळतंय का?
मुलांच्या डोक्यातले विचार आणि समाजाचा आरसा
एका वेगळ्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांत वध्र्याच्या आजूबाजूच्या खेडय़ांमधल्या नवतरु ण मुलामुलींशी बोलण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय युवा संगठनचे मनोज, प्रशांत, शिवाजी, पुष्पा, अंकित, अर्चना, शुभांगी असे अत्यंत समर्पित स्थानिक कार्यकर्ते अगदी आतल्या खेडोपाडी, चौदा ते पंचवीस वयोगटाच्या मुलामुलींमध्ये सामाजिक जाणीव रुजावी म्हणून ‘समाजभान शिबिरं’ घेताहेत. अशा तीन-चार शिबिरात सेशन घेण्याची संधी त्यांनी मला दिली. स्री-पुरुष सहजीवन आणि मुलगा/ मुलगी म्हणून घडताना अशा विषयांवर गप्पा मारायचं मी ठरवलं. हसत-खेळत फक्त गप्पा मारायच्या, काही प्रश्न विचारायचे आणि त्यांना त्यांची उत्तरं शोधू द्यायची. आपण काही उपदेश वगैरे द्यायचा नाही, त्यांनी विचारलं तर शेवटी स्वतर्चं मत मांडायचं, असं पथ्य पाळलं. यात मुलामुलींना बोलतं करण्यासाठी थिएटरच्या खेळांची खूप मदत होते. खेळता खेळता एका बाजूला निघालेले शब्द, मुद्दे फळ्यावर टिपून घेतले जातात आणि सर्वांचा मिळून एक माइंडमॅप तयार होतो. मुलामुलींच्या डोक्यातले प्रामाणिक विचार थोडेतरी सर्वांसमोर आले- नॉन जजमेंटली! तो माइंडमॅप आजच्या कोवळ्या समाजाचं छोटं प्रतिबिंब असतं.
अशा गप्पांमध्ये नेहमी निघणारा हा विषय.
‘सर्वात जास्त बांधलेलं कोण आहे- मुलगा की मुलगी?
मग घरकाम- शेतीकाम- नोकरीबाबत चर्चा होते. व्यक्त होता येण्याबाबत चर्चा होते. मुलगे स्वतर्च तयार केलेल्या चौकटीत कसे अडकलेले असतात अशा गप्पा होतात.
गप्पांमधून पुढे येतं ते असं.
सहजीवनात घर, संसार, मुलंबाळं, नातेवाईक आणि सर्व सांभाळून करिअर या सार्यात मुलगी ‘बांधलेली’ आहे हे खरं; पण निदान तिच्या हाती यातल्या काही गोष्टी न करण्याच्या निवडीची संधी आहे. पण, मुलांकडे मात्र ‘ब्रेडविनर’ होण्यावाचून काही पर्याय नाही.
‘मी आनंदानं घर, मुलं सांभाळतो’ असं म्हणण्याचा अवकाश मुलग्यांना नाही. इतकंच काय मुलांनी बापाला मिठी मारणं तर सोडाच आपल्याच मुलांमुलींविषयी जिव्हाळा व्यक्त करता येत नाही. चर्चा होता होता लक्षात येतं की ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा खरंच किती सार्या बंधनांच्या पार जाऊन प्रगती करतात. पार उच्चशिक्षणापर्यंत मजल मारतात. नोकरी, करिअर, प्राध्यापकी करतात.
विविध कारणांमुळे मुलगे मात्र शिक्षणातही मागे राहातात. कधी घरच्या जबाबदार्यांमुळे चटकन व्यवसाय करावा लागतो. घरच्या शेतीचा भार उचलावा लागतो. शिकत राहाण्याची ‘चैन’ फार कमी ग्रामीण मुलांना उपभोगता येते. त्याउपर ऐन शिक्षणाच्या काळात लागलेली व्यसनं, भरकटलेली मनं, शेजार्या-पाजार्याकडून ‘वाया जात चाललाय’ असे बसणारे शिक्के यामुळे कुठेतरी आत्मविश्वास गमावून बसतात. मुलींना निदान काही प्रमाणात आईकडे मन मोकळं करता येतं. मुलांना बाबांशी नाजूक विषयांवर बोलता येऊ शकत असं स्वप्नातही वाटत नाही. मुली मैत्रिणींशी छोटय़ा-मोठय़ा गोष्टी बोलून दाखवतात. मित्रांच्या गप्पांमध्ये आपल्यात काही कमी आहे असं मित्राला वाटेल या भीतीने काही गोष्टी सांगतल्या जात नाहीत. मुलग्यांनी स्वतर्साठीच कितीतरी चौकटी घालून घेतल्यात, ह्याची त्यांची त्यांनाच मजा वाटते.
अशाच एका गप्पांमध्ये प्रश्न होता सर्वात जास्त भीती कोणाला वाटते?
मुलाला की मुलीला?
बोलताना सर्वांच्या लक्षात आलं की मुलांना खरं तर भीती वाटत असते; पण ते ती व्यक्त करत नाहीत. मुलग्यांना मोकळेपणानं व्यक्त होण्याचीसुद्धा भीती वाटते.
मुलग्यांना सर्वात जास्त कशाची भीती वाटते? तर बायल्या म्हणल्या जाण्याची!
सगळ्या मुलांनी हेच सांगितलं, मग आम्ही त्या शब्दावर विनोद केले. काय काय म्हणल्यावर बायल्या म्हणतात त्याची यादी केली. तर रडणं, लागलं तर दुखतंय असं सांगणं, तब्येतीनं नाजूक असणं, आवाज नाजूक असणं, चालण्याची पद्धत, लाजणं, घरकाम करणं, कोणत्याही लहान मुलांना खेळवणं, स्वयंपाक करता येणं (यात नॉनव्हेजचा अपवाद!), मित्रांमध्ये खर्रा खाण्यास नकार देणं, दुसर्याशी सौम्यपणे वागणं, मारामारीचे खेळ/सिनेमे न आवडणं, इत्यादी इत्यादी कित्येक गोष्टी ‘बायल्या’ शिक्क्यापायी मुलग्यांना मोकळेपणानं करता येत नाहीत. त्यापुढे चर्चा सुरू झाली की मग त्या हिशेबाने खरं तर आपल्या इतिहासात किती बायल्या पुरु ष होऊन गेलेत? प्रेम, करुणा, वात्सल्य यांची प्रतीकं असणारे महापुरुष, संत ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळले असे विठोबा माउली, प्रेमळ शिक्षक साने गुरुजी, व्यक्तिगत आणि सामाजिक अहिंसेचा आग्रह धरणारे गांधीजींपर्यंत कित्येक सार्या बायल्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या त्यांच्या काळात जग बदललं. त्यांच्यामधलं ‘बायल्या’पण शोधताना मुलांना मज्जा वाटत होती. आम्ही सारे धो धो हसत होतो.
सेशन संपता संपता मी म्हणलं, ‘बघू बरं कोण हिंमतवान आहे इथे. जो म्हणेल हो. मी बायल्या आहे.’
अनेक पोरांनी ठाम नकार दिला तरी काही पोरं खरंच उभी झाली आणि त्यांनी ‘मी बायल्या आहे.’ म्हणलंसुद्धा.
सेशन संपता संपता मी म्हणले, ‘मी आज इथे येऊ शकले, तुमच्याशी गप्पा मारू शकले कारण माझा नवरा आत्ता घर आणि दोन बाळांना सांभाळतो आहे. माझा नवरा बायल्या आहे याचा मला अभिमान आहे.’ मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला! काही मुलांनी मुलींकडे कटाक्षही टाकले!
सर्व शिबिरांत मुलं अगदी पूर्ण रस घेऊन, कानांचे द्रोण करून ऐकत होती, सामील होत होती. त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती. खूप काही घेण्यासाठी आसुसलेपण दिसत होतं. त्यांच्याशी कोणीतरी गप्पा मारतंय हे त्यांना आवडत होतं. सेशनची वेळ संपूनही त्यांना खूप काही बोलायचं आहे, विचारायचं आहे हे जाणवत होतं.
परवाचं हिंगणघाट जळीत प्रकरण पाहताना प्रकर्षाने जाणवलं की आपल्या सगळ्यांपासून तुटलेला एक मोठा समूह आहे- खेडय़ापाडय़ातल्या मुलांचा. त्यांना खूप खूप प्रश्न आहेत, इनसिक्युरिटीज आहेत, मनात खूप गोंधळ आहेत, अर्धवट माहितीचा महासागर आहे. या गोंधळाचा, कमी झालेल्या आत्मविश्वासाचा समाज तोडणार्या कामासाठी वापर करून घेणार्या शक्ती बक्कळ आहेत. मुलांना मोकळेपणानं बोलता येईल अशा जागा फार कमी आहेत. शिक्के न मारता आपल्याला कोणी ऐकून घेईल, दिशा शोधायला मदत करेल अशी माणसं आजूबाजूला दिसत नाहीत. तिथे खूप काम करायला हवं. विशेषतर् मुलग्यांसाठी.
अनेक शतकं मुलींच्या ‘रक्षणा’साठी बंधनं लादण्यापासून ‘सबलीकरण’ कार्यक्र मांपर्यंत खूप काही केलं जातं आहे;
पण मुलग्यांच्या बाबतीत सारं काही आलबेल नाहीये.
‘रक्षण’ मुलींचं नाही..
मुलग्यांचं करायला पाहिजे.
‘पुरु ष’पणापासून!
(ओजस आयसर पुणे येथे रिसर्च फेलो, ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धा येथे वास्तव्यास असून, खादी क्षेत्रात कार्यरत आहे.)