तरुण मुलांनाही व्हायचंय गोरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:35 AM2017-08-17T05:35:00+5:302017-08-17T05:35:00+5:30
अभिनव मुकुंदला रंगावरून लोकांनी छळलं. हे अलीकडचं. पण काळ्या रंगाचा तरुण आणि गोरी मुलगी अशा जोडप्याचे फोटो टिंगल करत व्हायरल होतात.
-आॅक्सिजन टीम
अभिनव मुकुंदला रंगावरून लोकांनी छळलं.
हे अलीकडचं.
पण काळ्या रंगाचा तरुण आणि गोरी मुलगी
अशा जोडप्याचे फोटो टिंगल करत व्हायरल होतात.
मुलींना तर रंगावरून कायम अपमान सोसावे लागतात.
पण आता तरुण मुलांनाही गोरं होण्याच्या
भुतानं पछाडलंय.
ते का?
कशासाठी व्हायचंय गोरं त्यांना?
निमित्त अभिनव मुकुंद
भारतीय क्रिकेट संघाचा नवाकोरा सलामीवीर. रंगानं काळाच. तर तो उत्तम खेळला याचं लोकांना कौतुक नाही, त्याचे फोटो अनेकांनी व्हायरल केले. त्याच्या रंगावरून त्याची टवाळी करत त्याला सल्ले दिले. गोरं होण्याच्या क्रीम लाव म्हणाले..
यावर संतापलेल्या अभिनवने सोशल मीडियात पत्रच लिहून अशा वर्णद्वेषी लोकांना आपली जागा दाखवून दिली. ठणकावून सांगितलं की, काळं असणं काही चूक नाही. आणि गोरं असणं म्हणजेच हॅण्डसम असणं नव्हे. जरा कमी करा हा असा अट्टहास..
हे सारं एका क्रिकेट प्लेअरला या काळात सांगावं लागतं? कुठं चाललोय आपण समाज म्हणून? गोºया रंगाचं वेड आपल्या समाजाला नवीन नाही. आजवर मुलींच्या अनेक पिढ्यांनी ‘रंगात मार खाते’ म्हणत अपमान सोसले. आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडवल्या लोकांनी तरी मुकाट अपमान सोसले. आपण काळ्याच आहोत म्हणून सुंदर नाही, लग्नाच्या बाजारात खपत नाही असा बोल लावून घेतला.
आणि मग आल्या सात दिवसांत गोरं करून देणाºया क्रीम्स. काळ्यासावळ्या माणसांच्या उदंड बाजारपेठेत त्या मुबलक खपल्या. उलट त्यांनी काळं असण्याचा न्यूनगंड वाढवला. तुम्ही काळ्याच आहात म्हणून चांगली नोकरी, मनासारखं जगण्याचा हक्क, चांगला नवरा तुम्हाला मिळत नाही म्हणत मुलींना गोरं होण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडलं. आणि कोट्यवधी रुपयांची बाजारपेठ उदयास आली. पाच रुपयांच्या पाउचमध्ये मग गोरं होण्याच्या क्रीम्स विकल्या जाऊ लागल्या.
आणि हे सारं होताना टिपिकल ‘गोरीच मुलगी पाहिजे’ हा लग्नाच्या बाजारातला मोठा अडथळा कायमच राहिला. तरुण मुलांना मुलगीच काय त्यांची आई गोरी असणंही लग्नाच्या बाजारात महत्त्वाचं वाटत होतं, ते कायमचं राहिलं.
इथवर गोष्ट तशी जुनाट वळणाची. टिपिकल. आणि रडूपडूच होती. काहीच बदललं नाही असं वाटणारी. अर्थात काही मुलींनी धुडकावून लावली ही गोरेपणाची मक्तेदारी आणि जगू लागल्या त्या बिंधास्त.
मात्र इथंच काळानं भलताच टर्न घेतला. कारण बाजारपेठेनं या वळणावर वेगळीच हवा भरली सौंदर्याच्या फुग्यात.
पूर्वी लोक म्हणत मुलाचे गुण पाहावेत, रूप पाहू नये. पण आता तरुण मुलांनाच ही बाजारपेठ सांगू लागली की, तुम्ही गोरे नाही? तुमच्या अंगाला घामाचा वास येतो? तुमच्या केसात कोंडा झालाय? मग तुम्ही आउटडेटेड आहात? तुम्हाला कुणी नोकरी देणार नाही? कुणी छोकरी देणार नाही?
तुम्ही गोरे व्हा..
आणि तेही कसे? मुलींच्या लालीपावडरवाल्या क्रीम लावू नका. पुरुषांसाठीची मॅनली क्रीम लावा.
आणि मग तरुण मुलांनाही वाटू लागलं की, आपण गोरे नाही काळेसावळे आहोत म्हणून मागे पडतोय. आपला आत्मविश्वास कमी आहे. लोक आपल्याला मोजत नाहीत. आपलं लग्न ठरत नाही. आपलं नशीब फळफळत नाही.
म्हणून मग तरुण मुलांनी गोरं होण्यासाठीच्या क्रीम्स फासायला सुरुवात केली. बाजारपेठेनं हा न्यूनगंड पोसला, वाढवला. आणि पुन्हा पुन्हा सांगितलं गोरं व्हा, मॅनली व्हा, मग तुमचं नशीब फळफळेल. तुम्ही स्टार व्हा. मोठमोठे स्टार या प्रॉडक्टच्या जाहिराती करू लागले आणि पार खेड्यापाड्यात तरुण मुलांचं गोºया रंगाचं आॅबसेशन वाढलं.
‘आॅक्सिजन’ला येणारी पत्रं गेल्या काही काळात हेच सांगतात. अनेक तरुण मुलं लिहितात की, मी काळा आहे, रंग पक्का. मला कॉलेजात मुलं चिडवतात. छत्रीचं कापड म्हणतात. डांबर म्हणतात. निगेटिव्ह म्हणतात. काय काय बोलतात. मला गोरं व्हायचंय!
काहीजण तर कुठकुठल्या बड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात, कुणी स्किनच्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेण्ट घेतात.
कशासाठी? तर फक्त गोरं होण्यासाठी!
आणि यासाºयात त्यांच्या आत्मविश्वासाचा पार चक्काचूर झालेला असतो.
हे सारं काय आहे?
उष्ण कटिबंधातल्या आपला देशात बहुसंख्य लोक काळे सावळेच आहेत. आणि काळासावळा रंगही सुंदरच असतो. सौंदर्याची व्याख्या रंगावर ठरत नाही, हे आपण कधी मान्य करणार? कधी हा गोरेपणाचा हव्यास झुगारून देणार?
-विचारा स्वत:लाच?
गोरं होण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे तरुण मित्र असाच आटापिटा करतात का?
का करतात?
तरुण मुलांच्या डोक्यावर हे गोरं होण्याचं काय भूत बसलंय? मान अपमानाची ही काय गणितं आहेत?
अधिक तपशिलात कळवा आम्हाला.
ई- मेल oxygen@lokmat.com