गावकीचे तरुण कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 08:00 AM2021-01-28T08:00:00+5:302021-01-28T08:00:07+5:30
विजयाचा गुलाल पहिल्यांदाच अंगावर पडलेले तरुण ग्रामपंचायत सदस्य नेमकं काय म्हणतात?
- ऑक्सिजन टीम
नुकतीच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आता सरपंच निवडीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात जे काही ‘राजकारण’ होते ते होईलही; मात्र अंगावर नवानवा विजयाचा गुलाल पहिल्यांदाच ज्यांच्या अंगावर उधळला गेला अशा पंचविशीच्या आतल्या तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी ‘लोकमत ऑक्सिजन’ने गेल्याच आठवड्यात गप्पा मारल्या. यातले बहुसंख्य पहिल्यांदाच पंचायतीची निवडणूक लढवत होते, निवडूनही पहिल्यांदाच आले. वय वर्षे २१ ते २५. दूर खेडोपाडी, दुर्गम भागात राहणाऱ्या अजूनही विकासाचं वारं न पोहोचलेल्या गावांतली ही तरुण मुलंमुली. त्यांच्या डोळ्यांत आज तरी आपलं गाव बदलावं, इथं किमान सुविधा मिळाव्यात, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाणही मोठं आहे. लोकमत वृत्तसमूहाच्या गावोगावी पसरलेल्या वार्ताहरांनी सुमारे ५० हून अधिक तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी गप्पा मारल्या, त्यातून हाती आलेली ही काही निरीक्षणं...
१. या निवडणुकीचं एक निर्विवाद फलीत म्हणजे ग्रामपंचायतींना लाभलेला ‘तरुण’ चेहरा. पंचविशीच्या आतला. गावच्या ‘तरण्या’ पोरापोरींनी ठरवलं, की आता बास झालं! आता गावच्या ‘पंचायती’ आम्ही करू.. राजकारण तर असेलच त्यात, पण आता विकासाचं बोलू..
२. काही ठिकाणी गावात विरोध असूनही तरुणांनी आपापली पॅनल्स उभी केली. ही पोरंसोरं काय करणार, म्हणून गावात चेष्टा झाली, त्याकडे लक्ष न देता जिद्दीनं आपलं म्हणणं मांडलं, आणि आपापली पॅनल्स जिंकून आणली. काही ठिकाणी राजकीय पक्षांचं पाठबळ घेतलं, कुठं राजकीय पक्षांना स्पष्ट सांगितलं की, आमचं आम्ही लढतो, तुम्ही जरा सुरक्षित अंतर ठेवा आमच्यापासून, पुढचं पुढे पाहू!
३. यात तरुण मुलींची संख्याही जास्त. शहरांजवळच्या गावांतच कशाला, दुर्गम - आदिवासी भागातही तरुण मुली निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आणि मोठ्या प्रमाणात निवडून आल्या. त्यातल्या काही विवाहित आहेत, काही अविवाहित. राजकारणाच्या पंचायती कशाला, आधी लग्नाचं पाहा, असं सांगणाऱ्यांना या मुली स्पष्ट उत्तर देत म्हणतात, संसारही करूच, पण ज्या गावात राहतेय तिथले प्रश्न दुसरंच कुणी सोडवेल अशी वाट किती दिवस पाहत बसणार आता?
४. निवडून आलेले बहुसंख्य सदस्य गावातच राहणारे. शिकलेले. म्हणजे किमान पदवीधर तरी आहेतच. इंटरनेटचा वापर करणारे, सोशल मीडियाचा हात धरणारे, अनेक जण तर गावातल्या गावात सोशल मीडियावर प्रचार करूनही निवडून आलेले दिसतात.
५. निवडून आलेल्या तरुण सदस्यांना ‘ऑक्सिजन’ने विचारलं, गावात पहिला बदल कोणता करणार?
त्यावर तरुण पुरुष सदस्य मोघम सांगतात की, रस्ते, वीज, पाणी, गटारी यांचे प्रश्न सोडवू.
मात्र तरुणी?
त्या थेट सांगतात, आधी घरपोच नळ योजना, आधी पाण्याचा प्रश्न. पहिले हागणदारी मुक्ती, शौचालय पाहिजे. आधी रस्त्यांवर दिवे लावणार!
या गोष्टी किती आम आहेत, असं वाटेलही. पण ज्या मुलींना रोज या प्रश्नांशी लढावं लागतं. पाण्याचे हंडे वाहावे लागतात, रात्री अंधार म्हणून घराबाहेर पडता येत नाही आणि पहाटेच्या अंधारात लपत लोटापरेड करावी लागते; त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य अधिक आहे. बायकांच्या हाती सत्ता आली की, वेगळे प्रश्न अग्रक्रमावर येतात याची एक झलक या उत्तरांत नक्की दिसते.
६. हे तरुण गावकीचा कारभार कसा हाकतील, राजकारणापलीकडे सगळ्यांना सोबत घेऊन गावचा विकास कसा करतील, नक्की करतील का? हे पुढचे प्रश्न, त्याचीही उत्तरं या तरुणांना द्यावीच लागणार आहेत. मात्र तोपर्यंत तरी त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा..!
oxygen@lokmat.com