इगो हर्ट झालाय का? होऊ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:31 PM2018-12-20T12:31:31+5:302018-12-20T12:31:46+5:30

इगोनं घात केला असं आपण किती सहज म्हणतो, पण हर्ट झालेला इगो अपयशाला कशी प्रतिक्रिया देतो यावर यश-अपयश ठरतं तेव्हा?

your ego will make you successful.. | इगो हर्ट झालाय का? होऊ द्या!

इगो हर्ट झालाय का? होऊ द्या!

Next
ठळक मुद्देआपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार? की आपल्या इगोला देणार आव्हान?

अनन्या भारद्वाज

तरुण मुलं एक प्रश्न हमखास विचारतात. खरंतर ‘कारण’ सांगतात. एक वाक्य ठरलेलं असतं. ‘माझी  लाइफस्टाईलच अशी आहे, घरची परिस्थितीच अशी आहे की, मी नाही काही करु शकत.!’ हे वाक्य खोटं असतं का? तर नाही. खोटं नसतंच. पण ते पूर्ण सत्यही नसतं. कारण आजवरचा जग बदलून टाकणारा इतिहास असं सांगतो की, ज्यांचे हाथ परिस्थितीनं बांधुन टाकलेले होते त्याच माणसांनी ते बंध झुगारुन देत नवं जग घडवलं. सगळं मस्त चाललेलं असताना लोक जग बदलायला जात नाहीत. त्यामुळे माझ्या घरची परिस्थितीच अशी की, त्यामुळं काही जमलं नाही करायला हे वाक्य म्हणजे जे आपल्याला जमलं नाही, त्यावर घातलेलं पांघरुण असतं. 
-जरा कटूच वाटेल हे वाचताना पण हे खरं आहे. बराक ओबामा काय आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला माणूस, त्यानं कसं बदलून टाकलं जग अवतीभोवतीचं? स्टिव्ह जॉब्ज, फार सुखी आयुष्य आलं होतं का त्याच्या वाटय़ाला, पण तो रडत बसला की पुढं सरकला? विल्यम्स भगिनी काय परिस्थितीतून जगज्जेत्या बनल्या?
अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील, पण त्या यादीपेक्षा आपल्या अवतीभोवतीच्या जगातले आपलेच दोस्त पहा. त्यांचा आणि आपला प्रवास कदाचित एकाचवेळी सुरु झालेला असतो, काहीजण फक्त तक्रार करतात आणि अ‍ॅँग्री यंग मॅन मोडवर असतात. पण करत काहीच नाहीत. काहीजण त्यांच्यासारखेच चिडलेले असतात परिस्थितीवर मात्र तो आग, तो संताप योग्य जागी लावतात आणि त्या ऊर्जेवर पुढं निघतात.
हा बदल नक्की कसला?
मानसिकतेतला आणि कारणं न सांगता  झगडत राहण्याच्या वृत्तीचा.
अलिकडेच प्रसिद्ध झालेला एक अभ्यासही हे सांगतोच. जर्मनीतल्या सारालॅण्ड विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यास जरा चक्रावणारे निष्कर्ष मांडतो आहे. इगो, माणसांचं वर्तन, त्यामुळे होणारं नुकसान किंवा त्यातून होणारे फायदे यासंदर्भातली मनाची आणि प्रसंगी शरीराचीही प्रतिक्रिया यासार्‍याचा तपशिलवार अभ्यास करण्यात आला. आधीच्या अभ्यासातले अनेक दावे या अभ्यासानं मोडीत काढलेले आहेत. म्हणजे आधी असं मानलं जात होतं की, इगोमुळे माणसांचं नुकसानच होतं. त्याच्या प्रतिक्रिया चुकतात आणि इतर लोकांशी त्याचे संबंध बिघडतात. हा अभ्यास म्हणतो योग्य ठिकाणी लावलेला इगो तात्पुरत्या अपयशाचं रुपांतर यशात करु शकतो. अर्थात याविषयी मानसअभ्यास तज्ज्ञांत   अनेक मतभेदही निर्माण झाले आहेत. 
मात्र त्यातला महत्वाचा भाग म्हणजे माणसाचा इगो आणि त्याची झुंजत प्रतिक्रिया देण्याची वृत्ती कशी बदलते, अपयशाला तो कशी प्रतिक्रिया देतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा वरकरणी जे अपयश वाटतं ते त्याक्षणी अपयश नसतंच, ते एक पाऊल मागे जाणं किंवा खरंतर पुढं न जाणं असतं.
मात्र होतं काय, त्याचवेळी माणसाचा इगो आड येतो आणि त्या अपयशाला भयाण अपयश, हार समजण्याची चूक तो इगो करतो. काहीजण तिथंच शसत्र टाकून देतात आणि त्यांची प्रगती खुंटते.
काहींचा इगो मात्र त्या अपयशानं भारी हर्ट होतो. ते अपयश अत्यंत पर्सनली घेतात आणि पेटून उठल्यासारखे परत कामाला लागतात. त्यातून होतं असं की, ते अपयश हीच त्यांची शक्ती बनतं. आपण महान माणसांचे अनेक अनुभव ऐकतो, प्रेरणादायी भाषणं ऐकतो ते सांगतात एका अपयशानंतर पालटलेली त्यांच्या आयुष्याची दिशा! त्यावेळी अनेकदा वाटतंही की, नशीबानं साथ केली म्हणून यांना जमलं हे करणं, नसतंच जमलं आणि पुढं सारं चुकतच गेलं असतं, तर त्या अपयशाचं एवढं कौतुक झालं असतं का?
हा अलिकडेच प्रसिद्ध झालेला अभ्यास म्हणतो, कौतुक अपयशाचं नसतंच. त्या अपयशाला दिलेल्या प्रतिक्रियेचं असतं, त्यांच्या इगोचं नसतं, त्या इगोनं योग्यवेळी केलेल्या कृतीचं असतं. आणि माणसांच्या यशापयशात ही प्रतिक्रियाच बदल घडवते. 
आणि कदाचित म्हणूनच आपल्या अवतीभोवती गरीबीतून अत्यंत कष्टानं देदीप्यमान यश मिळवणारी माणसं दिसतात. एखादा धोनी मोठा स्टार झालेला दिसतो, आयपीएलसह अनेक खेळात अनेक खेळाडू मोठं यश संपादन करतात. मोठे उद्योगपती यशाच्या कहाण्या सांगतात आणि जगभरात नवीन राजकीय नेतृत्व करणारेही एकेकाळी आपल्या वंचित आयुष्याविषयी बोलतात.
आपण कशाविषयी बोलणार?
आपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार?
की आपल्या इगोला देणार आव्हान?
-उत्तर आपलं आपण द्यायचं आहे.

 

Web Title: your ego will make you successful..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.