झीशान!

By अोंकार करंबेळकर | Published: March 15, 2018 08:43 AM2018-03-15T08:43:23+5:302018-03-15T14:33:11+5:30

सरपटणारे प्राणी त्याचे दोस्त. त्यानं ठरवलं त्यांच्यासाठीच काम करायचं. आणि आता तो त्यांच्याच जगात रमलाय...

Zeeshan, Little Planet | झीशान!

झीशान!

Next

'मला वाइल्ड लाइफची खूप आवड आहे’ किंवा 'आम्ही वाइल्ड लाइफमध्ये काम करतो' अशी सहजपणे केलेली थेट विधानं हल्ली कानावर पडतात; पण म्हणजे नक्की काय करता असं विचारलं तर त्यांची जंगलाजवळ हॉटेलात राहाणं, जंगल सफारी किंवा फोटोग्राफी करणे यापलीकडे फार मोजके लोक जातात. वाइल्ड लाइफ म्हणजे जंगलात केलेले पर्यटन नाही हे लोकांना पटवून देण्यासाठी मुंबईचा झीशान मिर्झा काम करतो.
आरे कॉलनीतलं जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही मुंबईची फुप्फुसं आहेत. मुंबईत मरोळला राहणाºया झीशानला लहानपणापासून आरेच्या जंगलामध्ये फिरायची आवड लागली. शाळा-कॉलेज शिकतानाच झीशान मित्रांना घेऊन आरेमध्ये जायचा आणि दगड उलटेपालटे करून, पाला-पाचोळा, लाकडं हलवून साप शोधायचा. प्रत्येकवेळेस साप दिसायचेच असं नाही; पण सापांच्या शोधात त्यांना विंचू, गोम, पाली, सरडे, मुंग्या असे सरपटणारे प्राणी भरपूर दिसायचे. मग झीशानच्या डोक्यात आलं या प्राण्यांचं फोटो डॉक्युमेंटेशन करायला हवं. त्यानं आणि त्याच्या मित्रांनी प्राण्यांचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. पुढे याच विषयात शिक्षण घेण्याचा विचार त्यानं सुरू केला.
झीशानला स्वयंपाकाचीही आवड. ती आवड पाहून त्याच्या बाबांनी त्याला बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटला जायचं सुचवलं. पण, झीशानला सरपटणाºया प्राण्यांची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यानं प्राणिशास्त्रात बी.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये त्यानं प्रवेश मिळवला. या संस्थेत गेल्यावर संशोधन क्षेत्राचं मोठं दालनच त्याच्यासमोर उघडलं गेलं. इथं प्राण्यांच्या केवळ वैशिष्ट्यांचीच नाही, तर त्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्याचीही त्याला संधी मिळाली. आतापर्यंत त्यानं विंचू, पाल, साप, बेडूक अशा विविध प्राण्यांच्या ३५ प्रजाती शोधून काढल्या आहेत, तर सध्या नव्या १५ प्रजातींवर त्याचा अभ्यास सुुरू आहे. अर्थात या सगळ्या कामाचं, यशाचं श्रेय तो आई-बाबांच्या पाठिंब्याला देतोच. आपले पालक या निर्णयाच्या मागे विश्वासाने उभे राहिले म्हणूनच हे सगळं शक्य होतं हे तो आनंदाने सांगतो.
झीशानला त्याच्या मनासारखं संशोधनाचं काम मिळालं आहे. एखाद्या नव्या प्रजातीचं काम समोर असलं की उत्साहामुळे सतत त्या नव्या प्रजातीचेच विचार डोक्यात असतात. त्याबद्दलच्या उत्सुकतेमुळे कधीकधी झोपही येत नाही. भरपूर काम करायचं, प्राण्यांचं निरीक्षम करायचं, फिरायचं, फोटो काढायचे यामुळे समाधान मिळतं. सरपटणाºया प्राण्यांच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं हा फार महत्त्वाचा निर्णय होता असं त्याला वाटतं.
झीशान म्हणतो, 'कदाचित हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर मला भरपूर पैसे देणारं काम मिळालं असतं, पण आता मिळतंय तसं समाधान कदाचित मिळालं नसतं. सकाळी उठून नोकरीवर जाणं, संध्याकाळी उशिरा परत आल्यावर थकून झोपून जाणं म्हणजे करिअर नव्हे. मी प्राण्यांचा अभ्यास, संशोधन करायचं ठरवल्यावर काही लोक सरळ सांगायचे हे बघ, यामुळे तुझं पोट भरणार नाही. पण आता मागं वळून पाहिलं तर आपला निर्णय योग्य होता याची खातरी पटते.'

गेल्याच महिन्यामध्ये झीशानने मयूरेश आंबेकर या मित्राबरोबर केरळमधील पूर्व किनाºयावर सरड्याची नवी प्रजाती शोधली आहे. ख्यातनाम प्राणितज्ज्ञ आणि कीटक अभ्यासक सर डेव्हीड अ‍ॅटनबरो यांच्या नावावरून या प्रजातीचे नाव सिताना अ‍ॅटनबरोई असे ठेवण्यात आले आहे. या सरड्याच्या हनुवटीपासून मानेपर्यंत एक पंख्यासारखा अवयव असतो. निळा, लाल,पिवळा असा गडद रंगाच्या पंख्याद्वारे या सरड्यांचे नर मादीला आकर्षित करतात. सरपटणाºया प्राण्यांचा हा दोस्त म्हणूनच विरळा भासतो.

झीशान म्हणतो, सरडे हे निसर्गात पेस्ट कंट्रोलिंगचं काम करतात. किडे खाऊन ते माणसाला मदत करत असतात. साप, पाली, सरडे, विंचू यांच्याबद्दल पसरलेले गैरसमज दूर होऊन माणसाचे मित्र किंवा उपयुक्त प्राणी अशा दृष्टीने त्यांच्याकडे पहायला हवं.


( लेखक लोकमत ऑनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)

onkark2@gmail.com
 

Web Title: Zeeshan, Little Planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.