झुंबा
By admin | Published: May 9, 2014 12:09 PM2014-05-09T12:09:12+5:302014-05-09T13:37:22+5:30
नाचत नाचत व्यायाम करण्याचा एक भन्नाट प्रकार
Next
>झुंबा.
हा शब्द गेलाच असेल तुमच्या कानावरून? झुंबा ट्रेनर हे नव्यानंच उदयाला आलेलं आणि पूर्वी अस्तित्वातच नसलेलं एक करिअर.
इंटरनेट वापरताच तुम्ही, एकदा युट्यूबवर जाऊन पहाच की झुंबा करता कसं? एकदम डिस्कमध्ये गेल्यासारखं भन्नाट म्युझिक कानावर पडेल. लोकं तुफान नाचताना दिसतील, आणि आपलाच आपल्यावर विश्वास बसणार नाही की हे व्यायाम करताहेत?
पण ते खरंय, झुंबा हा नृत्यप्रकार नाही तर व्यायामप्रकार आहे. कोलंबियन डान्सर आणि कोरिओग्राफर अल्बर्ट ‘बेटो’ परेझ यांनी हा प्रकार १९९0 मध्ये तयार केला. एरोबिक व्यायाम प्रकार आणि हीप हॉप, साल्सा, सांबा, मार्शल आर्ट यांची सांगड घालून झुंबा हा व्यायामप्रकार तयार झाला. व्यायाम तर होतोच पण नाचल्याचा पूर्ण आनंदही यातून मिळतो. जगभरात सध्या या झुंबाची विलक्षण क्रेझ आहे.
मी झुंबाचे क्लासेस घेते. त्याआधी सात वर्षं मी जीममध्ये ‘फिटनेस एक्सरसाइज’ करतेय. सुरुवातीला नाशकातील काही जीम्समध्ये प्रशिक्षण घेतलं. अस्थिरोग तज्ज्ञांकडेही काम केलं. नंतर डॉक्टर्स, व्यावसायिकांच्या घरी जाऊन ‘फिटनेस एक्सरसइज’वर
प्रशिक्षण देऊ लागले. झुंबासुद्धा कॉलनी, सोसायट्यांमध्ये जाऊन शिकवला.
अलीकडेच मी स्वत:चं फिटनेस सेंटर सुरू केलं. फ्लोअर एक्सरसाईज अन् झुंबा हे प्रकार मी शिकवते. झुंबा करताना हजारो कॅलरीज् खर्च होतात. त्यामुळे शरीराचा समतोल राखण्यास मदत होते. आमच्याकडे ज्या महिला, मुली येतात त्यांना निव्वळ झुंबा शिकायचाय म्हणून शिकवून टाकला, असं होत नाही. आम्ही प्रत्येकीची ‘मेडिकल हिस्ट्री’ घेतो. त्यांच्या समस्यांचा अभ्यास करतो. मग त्यांना कोणत्या एक्सरसाइज कराव्या लागतील, हे ठरवतो. डान्सप्रमाणेच झुंबाविषयी अनेकांच्या मनात ‘मला जमेल की नाही?’ ही भीती असतेच; पण आम्ही त्यांना एकच सांगतो, ‘तुम्ही झुंबा एन्जॉय करा. त्यामुळे छान गप्पा होतात, शेअरिंग होतं. ताणतणाव कमी होतात.’
.हे ‘एवढं’ तरी हवंच.
१) सध्या अनेक डान्स क्लासेसमध्ये ‘झुंबा’ शिकवला जातो. झुंबाचा ‘नृत्य’ म्हणून ‘अपप्रचार’ झाल्याने असं होतंय. मात्र झुंबा इन्स्ट्रक्टरचं लायसन्स असल्याशिवाय ‘झुंबा’ शिकू नये अन् शिकवूही नये.
२) आधी आपण झुंबा शिकावा आणि मग शिकवण्याच्या विचार करावा. झुंबा हे नवीन करिअर असलं तरी ती एक कला आहे, हे लक्षात ठेवावं.
प्रज्ञा तोरसकर, झुंबा प्रशिक्षक