आळंदीकरांचा रिंगरोडला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:53 AM2017-08-01T03:53:43+5:302017-08-01T03:53:43+5:30
तीर्थक्षेत्र आळंदी, च-होली खुर्द व केळगाव लोकवस्तीतून पीएमआरडीएंतर्गत जाणाºया नवीन प्रस्तावित ११० मीटर रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
दिघी : तीर्थक्षेत्र आळंदी, च-होली खुर्द व केळगाव लोकवस्तीतून पीएमआरडीएंतर्गत जाणाºया नवीन प्रस्तावित ११० मीटर रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तो स्थलांतरित करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. ३१) बाधित शेतकरी, वारकरी यांनी मिळून औंध येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरण (पीएमआरडीए) उपायुक्त कार्यालयावर टाळाचा गजर करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आळंदी शहर रिंगरोड हटाव कृती समिती व पदाधिकाºयांनी एकजूट दाखवून हे आंदोलन केले. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व अर्धा तास सविस्तर चर्चा केली.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्र भूमीतून हा प्रस्तावित रिंगरोड जाणार असल्याने पवित्र तीर्थक्षेत्राचे दोन भाग पडणार आहेत. ज्या जागेतून रस्ता जाणार आहे, त्या ठिकाणी योगी चांगदेव महाराजांचे विश्रांतीस्थान, पद्मावती माता मंदिर, देवस्थानांच्या जमिनी, विविध वारकरी शिक्षण संस्था, मठ, मंदिरे, धर्मशाळा व कष्टकरी रहिवाशांची घरे येत आहेत. अनेकांना रिंगरोड प्रकल्पामुळे बेघर व भूमिहीन व्हावे लागणार आहे.
मागील सात-आठ वर्षात आळंदी शहराचे कार्यक्षेत्र वाढले आहे. आळंदी नगरपालिका हद्दीबाहेर दीड ते तीन किलोमीटरच्या पुढे आळंदीचा विस्तार झालेला आहे. आजही तो विस्तारीत होत आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यातून आलेले असंख्य वारकरी विस्तारीत भागात वास्तव्य करून वारीचा आनंद लुटत असतात. अशा सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा शासनाने जाणीवपूर्वक विचार करून ११० मीटरचा प्रस्तावित रिंगरोड रोड हा किमान पाच किलोमीटर दूर अंतरावरून करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या वेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुºहाडे, सचिन पांचुंदे, पांडुरंग वहिले, सागर बोरूंदिया, आदित्यराजे घुंडरे, अशोक कांबळे, पाटीलबुवा गवारी, कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी भोसले, काळुराम घोरपडे, ह.भ.प. हरिदास रक्ताटे, चेतन घुंडरे, संतोष भोसले, गणेश काळे, सुनील घुंडरे, सदाशिव कांबळे आदींसह वारकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आळंदी नगरपालिकेतही निवेदन देण्यात आले.