टेंभुर्णीजवळ कार अडवून महिलेचा खून

By admin | Published: May 30, 2014 01:18 AM2014-05-30T01:18:25+5:302014-05-30T01:18:25+5:30

शिक्षक पतीवर संशय : पोलिसांनी घेतले ताब्यात; गावाकडे जाताना पहाटे घडला प्रकार

Capture woman's car near Temburni | टेंभुर्णीजवळ कार अडवून महिलेचा खून

टेंभुर्णीजवळ कार अडवून महिलेचा खून

Next

टेंभुर्णी : ठाणे (मुंबई) येथील शिक्षक आपल्या पत्नीसह मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी या गावाकडे कारने निघाले असता पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णीपासून सात किलोमीटर अंतरावरील सापटणे पाटीजवळ अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार अडवून कारमधील महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवार, दि. २९ रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या गूढ घटनेबाबत पोलिसांनी मात्र मयत महिलेच्या शिक्षक पतीवर संशय व्यक्त केला असून, त्यास ताब्यात घेतले आहे. मूळचे मसलेचौधरी येथील रहिवासी असलेले सुभाष निवृत्ती भोसले (वय ४५) हे ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८१ मध्ये शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्या आईस वानर चावल्याने त्यांना पाहण्यासाठी सुभाष भोसले व त्यांची पत्नी सुनंदा भोसले (वय ३६) हे एम. एच. ०१ टी ३९०० या कारने मसलेचौधरी गावाकडे बुधवारी २८ रोजी मुंब्रा येथून सायंकाळी पाच वाजता निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गाने निघाले असता त्यांनी टेंभुर्णी येथील बस स्टॅडसमोर रात्री एक तास विश्रांती घेतली व पुढील प्रवासाला निघाले, त्यांची कार टेंभुर्णीपासून सात किलोमीटर अंतरावरील सापटणे पाटीजवळ आली असता पाठीमागून एक कार आली, त्यामध्ये दोघे होते. त्यांनी भोसले यांना कार थांबविण्यास सांगितले. कार थांबल्यानंतर एक जण खाली उतरला व भोसले यांना चाकूचा धाक दाखवून कार रोडच्या खाली घेण्यास सांगितले. यानंतर या अज्ञात दोन चोरट्यांनी भोसले यांच्याकडे पैशाची मागणी केली. भोसलेंना त्यांनी त्यांच्या कारमध्ये बसविले व मोर्चा भोसलेच्या पत्नीकडे वळविला. त्यांना मारहाण करुन अंगावरील दागिने काढून घेतले. नंतर बॅगमधील दहा हजार रुपये घेतले व भोसले यांना चोरट्यांनी त्यांच्या कारमध्ये मागील बाजूस बसविले व कार सोलापूरच्या दिशेने नेऊन काही अंतरावर खाली ढकलून दिले. यादरम्यान पहाटेच्या चार वाजले होते. भोसले रस्त्याच्या कडेलाच थांबले. उजाडल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार रस्त्याने जाणार्‍या एका जीपचालकास सांगितला. त्याने टेंभुर्णी पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यानंतर भोसले त्यांच्यासमवेत घटनास्थळी गेले, तेव्हा कारच्या समोर त्यांची पत्नी मृतावस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांचा संशय फिर्यादी भोसले याने शर्टच्या खिशातील ३५०० रुपये व सूटकेसमधील दहा हजार रुपये पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण अंदाजे १२००० रुपये व दीड तोळ्याचा हार अंदाजे ३५००० रुपये चोरीस गेल्याचे सांगितले आहे. परंतु वरील सर्व रक्कम व दागिने पोलिसांना घटनास्थळी मिळून आले आहेत. यामुळे पोलिसांनी फिर्यादी सुभाष भोसले यांच्यावरच संशय व्यक्त केला. या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, अपर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, बार्शी विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिदास पवार यांनी घटनास्थळास भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. पुढील तपासाच्या सूचना पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना दिल्या आहेत

. ----------------------------------

शिक्षकाची तिसरी पत्नी

मयत सुनंदा ही शिक्षक सुभाष भोसले यांची तिसरी पत्नी होती. पहिली पत्नी आजाराने मृत पावली, तिला १६ वर्षांचा मुलगा आहे. दुसर्‍या पत्नीने २००५ साली आत्महत्या केली होती, तिला ११ व नऊ वर्षांची दोन मुले आहेत. मयत सुनंदाबरोबर भोसले यांनी २०१३ साली मंदिरात तिसरे लग्न केले होते.

----------------------

तिसरी गंभीर घटना

दहा दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथे पैशाच्या वादातून एकाने आत्महत्या केली आहे. पाच दिवसांपूर्वी एका पाच वर्षांच्या बालिकेवर अज्ञात इसमाने बलात्कार केला आहे. या घटना ताज्या असतानाच आज महिलेच्या खुनाची घटना घडली आहे. या सर्व गंभीर घटनांतील आरोपींना गजाआड करण्याचे मोठे आव्हान टेंभुर्णी पोलिसांच्या समोर निर्माण झाले आहे.

Web Title: Capture woman's car near Temburni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.