माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 03:44 PM2018-01-13T15:44:24+5:302018-01-13T15:44:32+5:30
शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.
शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथे शिरगांव दशक्रोशीतील वारकरी माऊली, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमून हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिरगाव येथून गेली कित्येक वर्षे वारकरी माऊली पायी दिंडीत सहभागी होत आहेत.
यावर्षी शिरगांव गावातूनच माघवारीची समता पायी दिंडी सुरू व्हावी अशी येथील वारकरी माऊलींची इच्छा होती ती इच्छा शुक्रवार १२ जानेवारी रोजी पूर्ण झाली याचा आम्हा विठ्ठल भक्तांना अपार आनंद होत आहे. अशा प्रतिक्रिया वारीतील माऊलींनी दिल्या. ही दिंडी पुढे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघवारी समता पायी दिंडीमध्ये कणकवली येथे सहभागी होणार आहे.
शिरगांव येथील दिंडीत अबाल वृद्धांसह तरूण महिला, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिरगांव बाजारपेठ येथे दिंडी ‘चालली चालली...चालली...पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरीनामाचा’ यासारखा अभंग गात विठुनामाच्या जयघोषात रिंगण केले होते.
एकूणच माघवारीचा समता पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. तर वारकरी माऊलींचा चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी समता, बंधुभावाची दिलेली शिकवण आजच्या पिढीकडे संक्रमित व्हावी, तरूणांनी अध्यात्माकडे वळावे, वारकरी सांप्रदायाचा वेगाने प्रसार व्हावा, सामाजिक सलोखा निर्माण होत असतानाच एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा हे या समता पायी दिंडीच्या माध्यमातून होईल याची खात्री वाटते. त्यामुळे दरवर्षी या माघवारीमध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोक सामील होतात. समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आणि संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या वारीचे आयोजन केले जाते.
- सर्वोत्तम साटम, माघवारी समता पायी दिंडी प्रमुख