वाळू तस्करावर एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 05:46 PM2017-08-26T17:46:37+5:302017-08-26T17:47:02+5:30
वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
सोनपेठ ( परभणी ), दि. २६ : वाळू तस्करांवर सातत्याने कारवाई करुनही तस्करी कमी होत नसल्याने प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत तालुक्यात वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासुन वाळू चोरी व तस्करी करणाऱ्याविरुध्द सोनपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. यातून मोठा दंड ही वसुल करण्यात आला. या कारवाईची तमा न बाळगता तस्करी जोमात होती. यामुळे प्रशासनाने तस्करांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोनपेठ तालुक्यात वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले (३४, रा वैतागवाडी ता.सोनपेठ ) याच्या विरुध्द सोनपेठ येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे पाठवला.
या प्रस्तावास पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी मान्यता देऊन पुढील कारवाई साठी जिल्हाधिकारी पी शिवाशंकर यांच्याकडे पाठवला होता. वाळू तस्करांवर कठोर कारवाई करणाऱ्या पी. शिवशकर यांनी सदर प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन कचाले विरोधात एक वर्ष स्थानबध्दतेचा आदेश दिला. आदेश प्राप्त होताच सपोनि सदानंद येरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कचाले यास ताब्यात घेतले व एक वर्षाच्या स्थानबध्दतेसाठी औरंगाबाद येथील कारागृहात त्याची रवानगी केली आहे. महसुल व पोलिस प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.