आवक वाढल्याने येलदरी धरणाचे 10 दरवाजे पुन्हा उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:27 PM2020-08-20T15:27:08+5:302020-08-20T15:36:54+5:30
सध्या 10 दरवाजामधून 16 हजार 800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे या धरणाचे 10 दरवाजे दि 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1:55 वाजता पुन्हा उघडण्यात आले आहेत. याआधी दि. 17 रोजी रात्री 1:15 मिनिटाला 10 दरवाजे उघडलेले होते. दि. 19 रोजी सकाळी 8 वाजता 6 दरवाजे बंद करून 4 दरवाजे सुरू ठेवण्यात आले होते.
येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे येलदरी धरणात येवा वाढला आहे, सध्या 10 दरवाजामधून 16 हजार 800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. तसेच या धरणाच्या वरील बाजूला असलेले खडकपूर्णा धरण शंभर टक्के भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. हे पाणी येलदरी धरणात दाखल होत असल्यामुळे ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.
प्रकल्पातून पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. सध्या धरण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून, नागरिकांना या परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे