शेवटच्या दिवशी १०१ जणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:42+5:302021-02-23T04:26:42+5:30
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २२ फेब्रुवारी रोजी अखेरच्या दिवशी तब्बल १०१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ...
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २२ फेब्रुवारी रोजी अखेरच्या दिवशी तब्बल १०१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने जिल्हा बँकेचा परिसर दिवसभर इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची गर्दी झाली होती.
ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. २१ संचालक निवडीसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असून, २२ फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी आमदार सुरेश वरपूडकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मनपाचे उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह समशेर वरपूडकर, माजी खा. शिवाजी माने, प्रेरणा वरपूडकर, भावना रामप्रसाद कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीपर्यंत ५३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी १०१ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता एकूण उमेदवारी अर्जांची संख्या १५४ झाली आहे. एकूण जागांसाठी १५४ नामनिर्देशन दाखल झाल्याने बँकेच्या निवडणुकीसाठी चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, १२ मार्च रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा बँकेसाठी २१ मार्च रोजी मतदान होणार असून, २३ मार्च रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर केला जाणार आहे.
आज उमेदवारी अर्जांची छाननी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १५४ उमेदवारी अर्जाची छाननी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून केली जाणार आहे. त्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातील ८९ उमेदवारी अर्जांच्या छाननीला सकाळी ११ वाजेपासून प्रारंभ होणार आहे. सर्व प्रथम परभणी तालुक्यातील अर्जांची छाननी होईल. त्यानंतर जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, हिंगोली, सेनगाव, औंढा, वसमत तालुक्यांतील अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघातील सहा, इतर शेती संस्था मतदारसंघातील १३, महिला राखीव मतदारसंघातील १५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघातील दहा, इतर मागासप्रवर्ग मतदार संघातील सात आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील १४ उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.