जिल्ह्यात १०३३ रुग्ण; २० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:59+5:302021-04-28T04:18:59+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून, मंगळवारी १ हजार ३३ रुग्णांची नोंद झाली आहे तर २० रुग्णांचा कोरोनाने ...
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून, मंगळवारी १ हजार ३३ रुग्णांची नोंद झाली आहे तर २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे नागरिकांनी आता गांभीर्याने नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्ग वाढला आहे. मध्यंतरी ३ दिवसांत रुग्णांची संख्या बऱ्यापैकी घटली होती; परंतु मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही थांबत नसल्याने कोरोनाची धास्ती कायम आहे.
२७ एप्रिलला आरोग्य विभागाला ३ हजार ११४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार १३४ अहवालांमध्ये ७०२ आणि रॅपिड टेस्टच्या ९८० अहवालांमध्ये ३३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. एकूण १ हजार ३३ रुग्ण नोंद झाल्याने मागील दोन आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा नव्या रुग्णसंख्येने एक हजारांचा पल्ला ओलांडला आहे.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही थांबलेले नाही. मंगळवारी २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ३, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ६, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या २० रुग्णांमध्ये ६ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार १३३ झाली असून, त्यापैकी २५ हजार ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८३३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ६ हजार ८६० रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालय २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४१, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २५८, अक्षदा मंगल कार्यालय १३५, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ११८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ५ हजार ४२० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
७३५ रुग्णांना सुट्टी
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी ७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली.