१०४ गावांचा कारभार ४३ ग्रामसेवकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:01+5:302021-01-14T04:15:01+5:30
तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती असून १६ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक ग्रामसेवक देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ...
तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती असून १६ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक ग्रामसेवक देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा कणा असून तो गावच्या विकासासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून पाहिले जाते. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ही जबाबदारी ग्रामसेवकांवर असते. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटी, दूध संकलन केंद्र, नागरी पतसंस्था, स्थानिक महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था, शाळा तसेच शासनमान्य संस्था यांच्याशी समन्वय साधून गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सामाजिक उपक्रम राबवणे, जन्म-मृत्यू, उपजत मृत्यूच्या नोंदी ठेवणे, शेतीविषयक व कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी योगदान देणे, ग्रामपंचायतील सर्व प्रकारचे अभिलेखे जतन करणे, सरपंचांच्या मदतीने गावचा विकास करण्याची जबाबदारी पार पाडणे, अशी महत्त्वाची कामे ग्रामसेवकांना पार पाडावी लागतात.
गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कारभार ४३ ग्रामसेवकांवर आहे. या ग्रामसेवकांना १०४ गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार पाहिला जातो. त्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम होत असून, ग्रामसेवकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.