खेर्डा गावात तापीच्या साथीने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 05:23 PM2017-12-27T17:23:18+5:302017-12-27T17:24:54+5:30
खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पाथरी (परभणी) : खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून त्यांनी रुग्णांची रक्ताची नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.
हदगाव बु प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत खेर्डा येथे चिकन गुनिया व तापीच्या रुग्णांची अचानक वाढ झाली. यानंतर गावातील रुग्ण पाथरी येथे खाजगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचारासाठी दाखल होत आहेत. ५० पेक्षाही जास्त रुग्ण तापिने पाडीत आहेत. यातच श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीस ताप आल्यानंतर मंगळवारी पाथरी येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी रात्री 11.30 च्या सुमारास तिला परभणी येथे घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आज सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी खंदारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र हदगाव चे वैधकीय अधिकारी डॉ. जाधव यांचे चार जणांच्या पथक गावात दाखल झाले. याचसोबत परभणी येथील मलेरिया विभागाचे अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पथकासह गावात दाखल झाले.
रक्त नुमने घेतले
गावात घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी डेंगू , चिकन गुनिया, आणि मेंदू ज्वर यासाठी रक्त नमुने घेतली आहेत. तीन दिवसात याचा अवहाल प्राप्त होईल. तसेच श्रद्धा या मृत मुलीच्या रक्ताचे नमुने औरंगाबाद येथे तपासनीस पाठवल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. खंदारे यांनी दिली.
गावात तापीचा उद्रेक
तापीच्या रुग्णाची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने खेर्डा गावात 'तापीचा उद्रेक' झाल्याचे घोषित केले आहे. गावात 15 दिवस आरोग्य विभागाचे पथक कार्यरत राहणार आहे.