परभणी जिल्ह्यात ११६ पाणी नमुने दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:23 AM2018-01-07T00:23:26+5:302018-01-07T00:23:34+5:30
जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेमध्ये डिसेंबर महिन्यातील पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ११६ नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेमध्ये डिसेंबर महिन्यातील पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ११६ नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत़
आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची दर महिन्याला तपासणी करण्यात येते़ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, लघु प्रयोग शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते़ परभणी तालुक्यातील दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी व झरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावामध्ये २४२ पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यामध्ये दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६२ नमुन्यांपैकी १४ नमुने दुषित आढळले आहेत़ जांब अंतर्गत ५, पिंगळी ४ तर झरी केंद्रांतर्गत एका ठिकाणी दूषित पाणी नमुने आढळले आहेत़ पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील चार नमुने दूषित निघाले आहेत़
कावलगाव केंद्रांतर्गत १ तर ताडकळस केंद्रांतर्गत ४ नमुने दूषित निघाले आहेत़ पूर्णा तालुक्यात १३३ नमुने तपासण्यात आले़ गंगाखेड तालुक्यात धारासूर केंद्रांतर्गत चार नमुने, कोद्री १, महातपुरी ९, पिंपळदरी ३ तर राणीसावरगाव केंद्रांतर्गत १२ पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ तालुक्यातील ११० पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यापैकी एकूण २९ नमुने दूषित निघाले़ पालम तालुक्यात ९३ नमुने तपासण्यात आले़ यापैकी चाटोरी केंद्रांतर्गत ६ तर रावराजूर केंद्रांतर्गत ५ पाणी नमुने दूषित निघाले़
सेलू तालुक्यातील देऊळगाव गात केंद्रांतर्गत ६ तर वालूर केंद्रांतर्गत १४ पाणी नमुने दूषित आढळले़ एकूण ७७ नमुने तपासण्यात आले होते़ मानवत तालुक्यातील कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ तर रामपुरी केंद्रांतर्गत एका ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळले़ जिंतूर तालुक्यातील आडगाव, चारठाणा केंद्रांतर्गत प्रत्येकी ५, कौसडी १, वझर ४, येलदरी ३ असे १८ नमुने दूषित आढळले़
यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत ५६४ एकूण पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ७६ नमुने दूषित आढळले तर लघु प्रयोगशाळेत ३५८ नमुन्यांपैकी ४० पाणी नमुने दूषित निघाले आहेत़
पाथरी, सोनपेठ तालुक्यात शुद्ध पाणी
पाथरी तालुक्यामध्ये ५१ पाणी नमुने तपासण्यात आल़े़ यामध्ये बाभुळगाव, हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी १३, पाथरगव्हाण १८ तर वाघाळा आरोग्य केंद्रांतर्गत ७ नमुने तपासण्यात आले़ एकाही आरोग्य केंद्रांतर्गत दूषित पाणी प्रयोगशाळेमध्ये आढळले नाही़ तसेच सोनपेठ तालुक्यात ५० नमुने तपासण्यात आले़ सोनपेठ आरोग्य केंद्रांतर्गत एकाही गावामध्ये दूषित पाणी आढळून आले नाही़ तसेच पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर, जिंतूर तालुक्यातील आसेगाव केंद्रांतर्गतही एकही पाणी नमुना दूषित आढळला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे़
ब्लिचिंग पावडर वापराकडे होतेय दुर्लक्ष
आरोग्य विभागाच्या वतीने दूषित पाणी आढळलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला दरमहा पत्र पाठवून पाणी दूषित असल्याचे कळविले जाते़ परंतु, अनेक वेळा काही ग्रामपंचायती यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ काही ग्रामपंचायतीकडे तर ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत़ याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करून ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़