सार्वजनिक विहिरींची ११६ कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:32+5:302020-12-24T04:16:32+5:30

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक विहिरींची ११६ कामे सुरू असून, रस्ते आणि शेततळ्यांच्या कामांना ...

116 works of public wells started | सार्वजनिक विहिरींची ११६ कामे सुरू

सार्वजनिक विहिरींची ११६ कामे सुरू

Next

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक विहिरींची ११६ कामे सुरू असून, रस्ते आणि शेततळ्यांच्या कामांना मात्र प्रशासनाने फाटा दिला आहे. महत्त्वाची विकासात्मक कामे बाजूला ठेवल्याचा प्रकार होत आहे.

मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि विकास कामे मार्गी लागावीत, या दोन्ही उद्देशाने मनरेगा योजना राबविली जाते. लॉकडाऊन काळात मनरेगाची कामे ठप्प होती. मात्र अनलॉकची प्रक्रिया झाल्याने आता या कामांना वेग देणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही कामांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न तर निर्माण झाला आहेच, शिवाय विकास कामेही रखडली आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यात रोहयोची ७४४ कामे सुरू करण्यात आली. त्यात ७१० कामे वैयक्तिक स्वरुपाची आणि ३४ कामे सार्वजनिक स्वरुपाची आहेत. सार्वजनिक कामांची संख्या खूपच कमी आहे. वैयक्तिक कामे ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतली जातात. तर सार्वजनिक कामे विविध शासकीय यंत्रणांकडून केली जातात. त्यामुळे शासकीय यंत्रणांची उदासीनता यात दिसून येत आहे.

एकूण सुरू असलेल्या ३४ कामांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीची २८३ कामे हाती घेतली आहेत, रेशीम विभागाने तुती लागवडीची ११२ कामे सुरू केली आहेत. कृषी विभागाने फळबाग लागवडीची ११७ कामे सुरू केली आहेत. विशेष म्हणजे ही तीनही कामे वैयक्तिक स्वरुपाची आहेत. रस्ते, सार्वजनिक वृक्ष लागवड, रोपवाटिका, सिमेंट नाला बांध यासारख्या कामांकडे यंत्रणांनी पाठ फिरविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकास कामे वेगाने करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सार्वजनिक स्वरुपाच्या कामांवर भर देणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतींनी सुरू केली २२२ कामे

ग्रामपंचायतींनी मनरेगा अंतर्गत कामांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार २२२ कामे सुरु केली आहेत. त्यात घरकुलाची ८०, सार्वजनिक विहिरींची १२, वैयक्तिक विहिरींची ११६, सार्वजनिक वृक्ष लागवडीची १०, अंगणवाडी बांधकामाची ४ कामे सुरू करण्यात आली आहेत. वैयक्तिक विहिरींची सर्वाधिक ३७ कामे परभणी तालुक्यात सुरु आहेत. त्या खालोखाल पूर्णा तालुक्यात ३०, मानवत तालुक्यात २१, पाथरी १० आणि गंगाखेड तालुक्यात १७ कामे सुरू करण्यात आली आहेत. गंगाखेड, जिंतूर, मानवत, परभणी, पूर्णा, सेलू या तालुक्यात सार्वजनिक विहिरींची १० कामे सुरू करण्यात आली आहेत.

साडेआठ हजार मजुरांना रोजगार

मनरेगाच्या माध्यमातून मागील आठवड्यात जिल्ह्यात ७४४ कामे सुरू करण्यात आली. त्यात ८ हजार ६८५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ६६४ मजुरांच्या हाताला काम मिळाले. परभणी तालुक्यात १ हजार २७, मानवत ९९५, पूर्णा ९८१ आणि जिंतूर तालुक्यात ९३४ मजुरांना काम मिळाले आहे.

तालुकानिहाय सार्वजनिक कामे

गंगाखेड : १

जिंतूर : ८

मानवत : ४

पालम : २

परभणी : ६

पाथरी : ०

पूर्णा : ९

सेलू : १

सोनपेठ : ३

एकूण ३४

Web Title: 116 works of public wells started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.