वर्षभरात मास्क न लावणाऱ्या १२ हजार नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:31+5:302021-03-21T04:16:31+5:30
परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांना पोलीस प्रशासनाने दंड ...
परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांना पोलीस प्रशासनाने दंड सुनावला आहे. त्यातून २५ लाख १९ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आला.
गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध केला होता. याच काळात सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाले. हळूहळू व्यवहार सुरू झाल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मागील संपूर्ण वर्षभरात पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही अनेक नागरिक या आवाहनाला प्रतिसाद न देता विना मास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस प्रशासनाने मागील वर्षभराच्या काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांकडून प्रति नागरिक २०० रुपये या प्रमाणे २५ लाख १९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
२० हजार ७७९ वाहनधारकांवर केेसेस
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच वाहतुकीचे नियम डावलत वाहनधारक शहरातील रस्त्यांवरून फिरत होते. अशा २० हजार ७७९ वाहन चालकांविरुद्ध मागील वर्षात वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. या वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
परभणी शहरात सर्वाधिक दंड वसूल
जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली. विशेष म्हणजे परभणी शहरातच अनेक नागरिक विना मास्क फिरताना आढळले. पोलीस प्रशासनाबरोबरच महानगरपालिकेच्या पथकानेही शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया परभणीत झाल्या.
५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई
कोरोनाच्या संसर्ग काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. कोरोना वाढू नये, या उद्देशाने ही अंमलबजावणी केली जात असताना काही नागरिक मात्र प्रशासनाचे नियम डावलत रस्त्यांवरून फिरत होते. अशा नागरिकांची वाहने जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील करण्यात आली आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यांपर्यंत ४ हजार ६६१ नागरिकांविरुद्ध फौजदारी प्रतिबंधित संहिता कलम १०७ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच २२ नागरिकांविरुद्ध कलम १०९ प्रमाणे तर १९५ नागरिकांविरुद्ध कलम ११० नुसार कारवाई करण्यात आली. विना परवानगी आंदोलने करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
बिनधास्तपणा वाढला...
मागील महिनाभरापासून काेरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांचा बिनधास्तपणाही वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नियम डावलले जातात.
कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वाढला आहे. पोलीस प्रशासनाने नियम डावलणाऱ्या नागरिकांविरुद्ध पुन्हा एकदा कारवाया सुरू केल्या आहेत. शहरामध्ये विविध भागांत फिक्स पॉईंट लावून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे यावेळेस मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबविली जात आहे.