चार तालुक्यांमध्ये 1284 उमेदवारांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:12+5:302021-01-08T04:52:12+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हांचे वाटप होणार असल्याने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी ...

1284 candidates withdrew in four talukas | चार तालुक्यांमध्ये 1284 उमेदवारांनी घेतली माघार

चार तालुक्यांमध्ये 1284 उमेदवारांनी घेतली माघार

Next

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हांचे वाटप होणार असल्याने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. अंतिम उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी काही तालुक्यांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. त्यामुळे माहिती प्राप्त होऊ शकली नाही. दरम्यान, परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये ४३७ उमेदवारांनी माघार घेतली असून, १ हजार ५४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ७९ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होणार आहे. सेलू तालुक्यात २८४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ५५ ग्रा.पं.साठी १०१० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाथरी तालुक्यात २९१ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६७९ उमेदवार रिंगणात आहेत. मानवत तालुक्यामध्ये २७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ७१४ उमेदवार रिंगणात आहेत.

बोरी, चारठाणा, राणीसावरगाव ग्रा.पं.मध्ये सर्वाधिक उमेदवार

जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रा.पं.मध्ये ३९, चारठाणा ग्रामपंचायतीमध्ये ५१ आणि गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायतीमध्ये ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तीनही ग्रामपंचायती जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये गणल्या जातात. त्यामुळे या ग्रा.पं.च्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

बोरी ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष

जिंतूर तालुक्यातील बोरी हे मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोमवारी तब्बल ३९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सध्या दोन पॅनल आणि काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सेलू तालुक्यातील १२ ग्रा.पं. बिनविरोध

सेलू तालुक्यातील खैरी, कनेरवाडी, वाई, बोथ, गोहेगाव, तळतुंबा, पिंप्राळा, खुपसा, केमापूर, लाड नांद्रा, निरवाडी खु., करजखेडा, निपाणी टाकळी या ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. आ. मेघना बोर्डीकर यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २१ लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. त्यानुसार या बाराही ग्रामपंचायती निधीसाठी पात्र ठरल्या आहेत.

परभणी तालुक्यात ९ ग्रा.पं. बिनविरोध

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य संख्येएवढेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने तालुक्यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात जलालपूर, वरपूड, अंगलगाव, पांढरी, सोन्ना, धारणगाव, अमडापूर, तामसवाडी, आलापूर पांढरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे आता ८८ पैकी ७९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.

Web Title: 1284 candidates withdrew in four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.