१३ कोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:37+5:302021-03-23T04:18:37+5:30

गंगाखेड : १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील खळी पाटी ते मैराळ सावंगी या रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात ...

13 crore tree planting plan on paper only | १३ कोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच

१३ कोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच

Next

गंगाखेड : १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील खळी पाटी ते मैराळ सावंगी या रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र वृक्ष संवर्धनाअभावी लावण्यात आलेल्या ५ हजार झाडांपैकी बोटावर माेजण्याएवढीच झाडे जगल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. त्यामुळे १३ कोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच राबविल्याचे दिसून आले.

राज्य शासनाच्यावतीने १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावांत जाणाऱ्या रस्त्यांवर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने २०१८ मध्ये दुतर्फा झाडे लावण्यात आली. हजारोंच्या संख्येने झाडे लावून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आला. असे असतानाही तालुक्यातील खळी पाटी ते मैराळ सावंगी रस्त्यावरील खळी पाटी ते चिंच टाकळी, चिंच टाकळी ते मैराळ सावंगी या रस्त्यावर दोन टप्प्यात प्रत्येकी २ हजार ५०० प्रमाणे ५ हजार झाडे लावण्यात आली. या झाडांचे संवर्धन करताना सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. एकदा झाडे लावल्यानंतर दुसऱ्यांदा या झाडांकडे हे अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळेच ५ हजार झाडांपैकी केवळ बोटावर मोजण्याइतकीच झाडे जगल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे उर्वरित झाडे मात्र संवर्धनाअभावी जागेवरच सुकल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी ही झाडे पूर्णपणे जळून गेली आहेत. परिणामी वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही झाडे जगली नाहीत. त्यामुळे संपूर्ण खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

पदभाराबाबत कार्यालयातील कर्मचारी अनभिज्ञ

१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्यात किती झाडे लावण्यात आली व खळी पाटी ते मैराळ सावंगी रस्त्यावरील झाडांची माहिती घेण्यासाठी २२ मार्च रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास शहरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या परीक्षेत्र कार्यालयास भेट दिली. तेव्हा या कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. रजिस्टरवर खतावणी करीत असलेल्या व्यक्तीस वृक्ष लागवडीसंदर्भात विचारणा केली, तेव्हा माझ्याकडे माहिती नाही. मात्र, गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव सांगून माहिती घ्यावी, असे सांगण्यात आले. मात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जागी कोणते अधिकारी, या कार्यालयाचा पदभार कोणाकडे आहे, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

Web Title: 13 crore tree planting plan on paper only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.