४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:25 PM2022-06-20T16:25:18+5:302022-06-20T16:25:49+5:30
मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.
परभणी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आली की तेथून पुढे रखडतात, असा आजवरचा अनुभव असून, सध्याही जिल्ह्याच्या हद्दीत तीन पैकी दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. परिणामी वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे.
कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र.६१, परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर आणि जालना- सेलू या राज्य महामार्गाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या कामांपैकी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम वेगाने हाती घेतले. हा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली. मात्र इतर महामार्गांची कामे रखडली आहेत. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाथरीपर्यंत झाले आहे. या मार्गावरील मानवतरोड ते परभणी इथपर्यंत कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवला अन् काम बंद केले. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त होते. आता कुठे या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. याच मार्गादवर जिल्ह्याच्या हद्दीवर झिरोफाटा ते आसोला पाटीपर्यंत काम रखडले आहे. परभणी ते जिंतूर या रस्त्याची स्थितीही अशीच आहे. अनेक भागात कामे अजून पूर्ण झाली नाहीत. मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.
४ वर्षांत १३० बळी
कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील मानवतरोड ते झिरोफाटा या ४४ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र तरीही काम ठप्प आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रश्नात लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले होते. त्यात मागील चार वर्षांत ४४ कि.मी.च्या या रस्त्यावर १३० अपघाती मृत्यू झाल्याची नोंद घेतली होती. तसेच खराब रस्त्यामुळे अपघात वाढत असल्याचे नमूद करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मानवतरोड ते परभणी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र झिरोफाटा भागात काम रखडलेले आहे.