निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:51 PM2020-09-21T13:51:41+5:302020-09-21T13:55:21+5:30
निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले असून नदीपात्रात २५ हजार २२३ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सेलू : परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून सोमवारी सकाळी धरणाचे पुन्हा ८ दरवाजे उघडले आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले असून नदीपात्रात २५ हजार २२३ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक अचानक वाढली. त्यामुळे रविवारी सकाळी प्रकल्पाचे चार दरवाजे ५० सेमीने उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला गेला. परंतू पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने साेमवारी सकाळी आणखी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
चार मार्गावरील वाहतूकीवर परिणाम
निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने दुधना नदीला पुर आला आहे. हादगाव- केदारवाकडी, सेलू- राजवाडी- वालूर, मानवत रोड- वालूर आणि सेलू- देवगावफाटा या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे.
नदीकाठीवरील गावांना केले सतर्क
दुधना नदीपात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात असल्याने महसूल प्रशासनाने नदीकाठावरील पुर नियंत्रण रेषेवरील गावांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. ६० हजार क्युसेसने विसर्ग करण्याची वेळ आली तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे यंञणा सज्ज ठेवण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.