जिल्ह्यातील १४ आरोग्य केंद्रे धोक्याची, ना अग्निशमनची, ना विजेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:42+5:302021-01-16T04:20:42+5:30
परभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १४ आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. शिवाय या केंद्रांमध्ये अग्निशमनची आणि विजेच्या ...
परभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १४ आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. शिवाय या केंद्रांमध्ये अग्निशमनची आणि विजेच्या अनुषंगाने केव्हाच तपासणी झाली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतीबरोबरच अग्निशमन, विजेची तपासणी केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यात भंडारा येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवानंतर राज्यातील आरोग्य संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिथे जिल्हा स्तरावरच कधी अग्निशमनची तपासणी झाली नाही, तिथे ग्रामीण भागाचा काय प्रश्न. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्यसेवा पुरविली जाते. मागच्या एक-दोन वर्षांपासून आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांना सुरुवात झाली आहे. मात्र, बरीच आरोग्य केंद्रे सध्या जुन्याच इमारतीतून चालतात. परभणी तालुक्यातील दैठणा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हदगाव, सेलू तालुक्यातील वालूर, जिंतूर तालुक्यातील आडगाव, आसेगाव, येलदरी, कौसडी पालम तालुक्यातील चाटोरी या आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. पावसाळ्यात इमारत गळत असल्याने शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. तसेच पाणी मुरून भिंती पडण्याची भीती कायम असते. जिल्ह्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आतापर्यंत विजेची आणि अग्निशमनची तपासणी (फायर, इलेक्ट्रिक ऑडिट) झाली नाही. त्यामुळे आता या दृष्टीने केव्हा तपासण्या होणार? हा कळीचा मुद्दा आहे.
कोरोनाच्या संकट काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरावर अद्ययावत साहित्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात केंद्राची इमारत गळत असल्याने महागडी वैद्यकीय यंत्रसामग्री अक्षरश: झाकून ठेवण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात विजेच्या वायरिंगचेही असेच हाल आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांची अग्निशमन, विजेची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी दिले आदेश
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अग्निशमन आणि विजेची तपासणी करून घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केव्हा होणार, याची प्रतीक्षा लागली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धोकादायकच आहेत.