पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:51 PM2018-03-14T12:51:11+5:302018-03-14T12:52:49+5:30
शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला.
पाथरी ( परभणी ) : येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला. यामुळे दुध घेऊन आलेले शेतकरी चांगलेच संतापले. केंद्र बंद झाल्याने या भागातील १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्य शासनाचे परभणी येथे दूध संकलन केंद्र आहे, या केंद्र अंतर्गत पाथरी येथे गेल्या 12 वर्षी पासून दूध संकलन केले जाते, मागील काही वर्षात शेत उत्पन्नात घट होत असल्याने या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. यातच गेल्या वर्षभरात दूध संकलन मोठया प्रमाणावर वाढले गेले आहे. तालुक्यात दर रोज किमान 14 हजार लिटर दुध संकलन होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने 14 दिवसा पासून सकाळ संध्याकाळ या दोन वेळा दूध संकलन होते. सकाळी 9 हजार लिटर तर सायंकाळी 5 हजार लिटर असे संकलन या केंद्रात होते.
सकाळचा प्रश्न मिटला
आज सकाळी शेतकऱ्यांची दुधाने भरलेली वाहने येथील बाजार समिती च्या आवारात असलेल्या संकलन केंद्रात आली. मात्र केंद्राला कुलूप होते. यामुळे शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी रस्त्यावर दूध फेकून देण्याच्या तयारी केली. याचवेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यानंतर पोलीस, शेतकरी व शासकीय अधिकारी यांची चर्चा होऊन आलेले दुध शासनाच्या वतीने परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रात नेण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने हा प्रश्न तात्पुरता मिटला गेला असला तरी सायंकाळी येथे संकलनासाठी येणाऱ्या दुधाबाबत अनिश्चितता आहे. यावेळी दूध उत्पादक संस्थेचे पपु घांडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आम्ले शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खयूंम आदींची उपस्थिती होती.
कुलर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
पाथरी येथील दूध संकलन केंद्रात 3 बल्क कुलर आहेत. त्यातील एक बल्क कुलर कायमचे बंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन कुलरवर काम सुरू होते. मात्र, चार दिवसांपूर्वी यातील एक कुलर बंद पडले. त्यामुळे दूध संकलनाचा प्रश्न अचानक निर्माण झाला. यातच मंगळवारी दूध उत्पादक संस्थेच्या नावे जिल्हा कार्यालयाने पत्र काढून येथे दूध संकलन केले जाणार नाही. संकलित दूध संस्थांनी परभणी येथे नेऊन घालावे असे कळवले. मात्र, काही संस्थाना हे पत्र मिळाले नसल्याचे कळते.