पालम तालुक्यातील १४ गावांचा तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:21 AM2021-09-24T04:21:49+5:302021-09-24T04:21:49+5:30
परभणी : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस होत असून, पालम तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या नद्यांना पूर आल्याने १३ ...
परभणी : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस होत असून, पालम तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या नद्यांना पूर आल्याने १३ गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचप्रमाणे दुधना नदीला पूर आल्याने मानवतरोड - वालूर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
पालम तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या नद्यांना पूर आला आहे. तालुक्यातील पुयनी येथे लेंडी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी, तेलजापूर आणि गणेशवाडी या गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे. याच नदीवर पालम शहराजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे. सायाळा ते सिरपूर या मार्गावर गळाटी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सायाळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. २३ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे शहरातील मारोती मंदिराजवळ पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे मानवतरोड ते वालूर या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस होत आहे. त्यामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे.