पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१
By मारोती जुंबडे | Published: April 18, 2023 04:49 PM2023-04-18T16:49:18+5:302023-04-18T16:49:49+5:30
ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.
परभणी : शेतकऱ्यांना शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनाने १४६२ कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये १२९७ कामांना प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८४१ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक शेती अवजारांची ने-आण करावी लागते. त्याचबरोबर पीक कापणी व काढणी केल्यानंतर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेत बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्याचबरोबर रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत आहेत. या सर्व तंट्यांना आळा घालून शेतकऱ्यांना शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, या हेतूने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १४६५ रस्त्यांना मंजुरी दिली. हे रस्ते पावसाळ्याअगोदर झाले तर शेतकऱ्यांना सोयीच्या होणार आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत १२९७ कामांनाच प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ ८४१ कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धीचे पाणंद रस्ते योजनेवर करण्यात येणारा लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनयोग होऊन शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
१४६५ कामांना मंजुरी
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४६२ शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.
१२९७ कामांना मान्यता
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ९ तालुक्यांत १४६२ कामांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता केवळ १२९७ कामांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर जिल्हा प्रशासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे उरकून घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
१२९७ कामांना कार्यारंभ; सुरू केवळ ८४१
ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत १४६२ रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी आतापर्यंत प्रशासनाकडून १२९७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यावरूनही प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या सर्वच्या सर्व १३९७ कामांना कार्यारंभ आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र ८४१ कामे सुरू आहेत. आज स्थितीत ६२१ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याअगोदर ही कामे झाली तर शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणार आहे.
कोणत्या तालुक्यात काय स्थिती
तालुका मंजुरी मान्यता कार्यारंभ सुरू
गंगाखेड १७० १५५ १५५ १०५
जिंतूर २४९ २३७ २३७ ९०
मानवत १०७ ८१ ८१ ३८
पालम १०५ ६० ६० ५३
परभणी २८४ २७५ २७५ १६५
पाथरी ११९ १०२ १०२ ३८
पूर्णा १८४ १५९ १५९ १२४
सेलू १८५ १७५ १७५ १७५
सोनपेठ ६९ ५३ ५३ ५३
एकूण १४६२ १२९७ १२९७ ८४१
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आढावा
पाणंद रस्ते मंजुरी.....................१४६२
प्रशासकीय मान्यता......................१२९७
कार्यारंभ आदेश........................१२९७
कामे सुरू ..................................८४१
अद्याप सुरू न झालेली कामे.................६२१