गंगाखेडमध्ये जुगार अड्ड्यावर मोठी कारवाईत १५ जणांवर गुन्हे; तीन लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:18 PM2019-03-18T14:18:44+5:302019-03-18T14:18:58+5:30
मोंढा बाजारपेठेत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
परभणी : गंगाखेड शहरातील मोंढा बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १७ मार्च रोजी रात्री मोठी कारवाई केली असून, जुगार खेळणाऱ्या १५ जणांना पकडले आहे. सुमारे ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे.
मोंढा बाजारपेठेत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी १५ जण जुगार खेळत असताना आढळले. या आरोपींकडून १ लाख ४६ हजार १५० रुपये नगदी, १ लाख २१ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, ४ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकल असा ७ लाख ३५ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
बाळकृष्ण गोपीनाथ जाधव, भास्कर लिंबाजी जाधव, रामभाऊ बाबुराव जाधव, राहुल बाबाराव लोंढे, सुभाष गंगाधरराव डमरे, बालाप्रसाद ओमप्रकाश भंडारी, श्यामसुंदर वासुदेव पांपटवार, गोपाल रामप्रसाद सारडा, नाशिक नागनाथ जाधव, प्रवीण शांतीलाल काबरा, सोमेश्वर बाबुराव साखरे, वैजनाथ पंडितराव पाळवदे, गोविंदराव गुलाबसिंग राठोड, मनोज प्रकाश काकाणी, हनुमंत सत्यनारायण भुतडा या १५ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी लांजिले, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सैदाने, विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. पांचाळ, हे.कॉ. सखाराम टेकुळे, हनुमंत कच्छवे, श्रीकांत घनसावंत, अतूल कांदे, जगदीश रेड्डी, पूजा भोरगे, दीपक मुंडे यांनी ही कारवाई केली.