घरामधूनच व्हायची गांजा विक्री; गहू आणि तांदळाच्या पिशवीत ठेवलेला १६ किलोचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:13 PM2020-03-11T15:13:49+5:302020-03-11T17:47:01+5:30
जप्त गांजाची किंमत जवळपास १ लाख ६६ हजार आहे.
गंगाखेड : शहरातील भंडारी कॉलनीत पोलिसांनी एका घरावर छापा मारून मंगळवारी ( दि. १० ) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास १६ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. जप्त गांजाची किंमत जवळपास १ लाख ६६ हजार आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून भंडारी कॉलनी येथील उमर खान उर्फ पप्पू वहाब खान पठाण हा स्वतःच्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. यावरून मंगळवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख, सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू ननवरे, पो. ना. आनंद जोगदंड, पोलीस शिपाई सय्यद उमर, राजकुमार बंडेवाड, महिला पोलीस शिपाई प्रिया जाधव, चालक सुग्रीव सावंत, कृष्णा तंबुड यांच्या पथकाने उमर खान उर्फ (पप्पू) वहाब खान पठाण याच्या घरावर छापा मारला. यावेळी घराच्या झडतीत एका पिशवीत ७ किलो ७६३ ग्राम, दुसऱ्या पिशवीत ७ किलो ५६४ ग्राम व कॅरीबॅगमध्ये १ किलो २४३ ग्राम असा एकूण १६ किलो ५७० ग्राम गांजा जप्त केला. याची अंदाजे किंमत १ लाख ६६ हजार आहे. याप्रकरणी उमर खान यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख हे करीत आहेत.