जिल्ह्यातील १६६ लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:18 AM2021-07-30T04:18:59+5:302021-07-30T04:18:59+5:30
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी प्रत्येक नागरिकाला लसीकरण करावयाचे आहे. मात्र जिल्ह्याला अपेक्षित लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य ...
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी प्रत्येक नागरिकाला लसीकरण करावयाचे आहे. मात्र जिल्ह्याला अपेक्षित लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य यंत्रणेने समोरील अडचणी वाढल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने यंत्रणेची अवस्था ‘अडकित्यात सुपारी’ सारखीच झाली आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातही लसीकरण सत्र राबविण्याची सुविधा करण्यात आली आहे. एकूण २०६ लसीकरण केंद्रांवर लस देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवारी १६६ केंद्र लस नसल्याने बंद ठेवावे लागले. दिवसभरात ४० केंद्रांवर केवळ १ हजार ७५४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस द्यावयाचे आहेत. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख १५ हजार १४२ नागरिकांनीच दोन्ही डोस घेतले आहेत.
कोविशिल्डचे चार लाख डोसच मिळाले
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ३ लाख ९६ हजार ५७३ आणि कोव्हॅक्सिनचे १ लाख २६ हजार ७९७ डोस उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही लसीच्या माध्यमातून ५ लाख २१ हजार ३७० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.