परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:01 AM2017-12-16T01:01:09+5:302017-12-16T01:01:26+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सेलू तालुक्यातील १९, जिंतूर तालुक्यातील २६, पालम तालुक्यातील १३, गंगाखेड तालुक्यातील २४, मानवत तालुक्यातील १७, सोनपेठ तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील १२, परभणी तालुक्यातील ३४ व पाथरी तालुक्यातील ४ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गाव शिवारात सिमेंटनाला बांध, कोल्हापुरी बंधारे, नदी, ओढे खोलीकरण, सलग समतलस्तर, विहीर पूनर्भरण, ढाळीचे बांध, मातानाला बांध, शेततळे आदी कामे करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ६ हजार ६१६ कामे करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ७५५ ढाळीचे बांध उभारण्यात आले. त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. १४६ सलग समतलस्तर तयार करण्यात आले.
७५ मातीनाला बांधाची कामे पूर्ण करण्यात आली. जिल्हाभरातील एकूण ६ हजार ६१६ कामांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. याबाबतचा अहवालही आता राज्य शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर राज्यशासनाने ही गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांमध्ये आता पुढील किमान तीन वर्षे तरी जलसंधारणाची कामे घेता येणार नसल्याचे समजते.
गतवर्षीच्या कामांना मार्चपर्यंत मुदतवाढ
२०१५-१६ ची कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानांर्गत जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली होती. जून २०१७ पर्यंत या गावांमध्ये कामे पूर्ण होेणे आवश्यक होते. जवळपास ६ हजार कामे यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु, साडे तीन हजार कामांचे आराखडेच जून २०१७ पर्यंत तयार झाले नव्हते.
या संदर्भात जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी आढावा बैठक घेऊन विविध यंत्रणांच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यानंतर कामांचे आराखडे तयार करण्यात आले. आराखडे तयार करण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत चालले. त्यानंतर या कामांना आता कुठे सुरुवात झाली. सद्यस्थितीत शेतींमध्ये पिके उभी असल्याने कामांना अडचणी येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. ही बाब विचारात घेऊन या कामांना मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यावर्षीच्या कामांना पुढील वर्षीच मुहूर्त
गतवर्षीचीच कामे यावर्षी पूर्ण झाली नसल्याने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता निवडलेल्या १२८ गावांतील कामांना पुढील आर्थिक वर्षातच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. २०१६-१७ मधील कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मनसुबा संबंधित यंत्रणांनी बाळगल्याने यावर्षीच्या कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. परिणामी २०१६-१७ मधील कामाच्या दिरंगाईचा फटका २०१७-१८ मध्ये निवडलेल्या गावांना बसणार आहे.