१८४ गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:21+5:302020-12-09T04:13:21+5:30

जिंतूर- राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून ड्रोनद्वारे हे मोजमाप होणार आहे. गावठाण मोजणीची कार्यवाही ...

184 villages will be counted by drone | १८४ गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी

१८४ गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी

Next

जिंतूर- राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून ड्रोनद्वारे हे मोजमाप होणार आहे. गावठाण मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गावातील प्रत्येक घरमालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड (पीआर) ही दिले जाणार आहे. या योजनेत सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अभिलेख शासकीय स्तरावर तयार केले जाणार आहेत.

भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून जिंतूर तालुक्यात १० डिसेंबरपासून ड्रोनद्वारे मोजणीस सुरुवात होणार आहे. एका महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक गावांची गावठाणची जागा मोजली जाणार आहे. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याने प्रत्येक घर व शासनाची जागा मोजली जाणार आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत १४८ गावे आहेत. मोजणीसाठी पथके तयार करण्यात आले असून एका पथकाकडे ७ ते ८ गावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये गावठाण हद्द निश्चित करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व सरपंच त्यांच्या मदतीला असणार आहेत. या मोजणीमध्ये गावातील अंतर्गत रस्ते, घर तसेच मोकळ्या जागेचे नकाशे तयार केले जाणार आहेत. तसेच प्रॉपर्टी कार्ड तयार करून ग्रामस्थांना दिले जाणार असल्याची माहिती तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख एच.पी.मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास होणार मदत

ग्रामपंचायतीकडे गावठाणांचे अभिलेख उपलब्ध नसल्याने आपली नेमकी किती जागा आहे, याची माहिती ग्रा.पं.ला नाही. मालमत्तांचे मालकीपत्र नसल्यानेही ग्रामस्थांना यामध्ये गृहकर्ज, बँक तारण किंवा कर्ज मिळत नाही. गावठाण मोजणीनंतर प्रत्येक गावातील नदी-ओढे, शेत रस्ते यांचीही माहिती मिळणार आहे.त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतला मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात कराच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. कारण आतापर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मिळकती व मालमत्तांची गणना झालेली नाही. तसेच या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारकडून देण्यात आले. परंतु, अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशेच उपलब्ध नाहीत. आता मात्र गावठाणांचे भूमापन झाल्यानंतर सर्व माहिती ग्रामपंचायतींना मिळणार असून ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

जिंतूर शहराचीही होणार मोजणी

तालुक्‍यातील १४८ गावांची मोजणी होण्याबरोबरच शहरातही भूमी अभिलेख कार्यालयाकडून सिटी सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या संपत्तीचे पीआर कार्ड देण्यात येणार आहे. मोजणी झाल्यानंतर एकाच महिन्यात शहरातील नागरिकांना हे कार्ड मिळणार आहे.

Web Title: 184 villages will be counted by drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.