परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान
By मारोती जुंबडे | Published: November 20, 2024 11:46 AM2024-11-20T11:46:01+5:302024-11-20T11:46:56+5:30
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत.
परभणी: विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान सरासरी १८.४९ टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी माहिती दिली.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेल्या मतदानाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.१२ टक्के, परभणी १९.६२, गंगाखेड १६.८५ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २०.६१ टक्के मतदान झाले आहे. केंद्रांसमोर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मतदानादरम्यान पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील एका केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाली होती. मात्र लगेचच अधिकाऱ्यांनी हे यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. सकाळच्या सत्रात शहरी भागासह ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे घराच्या बाहेर पडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
दोन तासात झाले होते ६. ५९ टक्के मतदान
सकाळी सात ते नऊ या दोन तासात जिंतूर विधानसभा मतदारसंघात ६.९२ टक्के मतदान झाले होते. परभणी ७.१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर गंगाखेड ५.१६ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात ७.३६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
असे झाले विधानसभानिहाय मतदान
जिंतूर विधानसभा.....१७.१२
परभणी विधानसभा..... १९.६२
गंगाखेड विधानसभा.... १६.८५
पाथरी विधानसभा..... २०.६१