काळ्या बाजारात जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त; परभणीत चार ठिकाणी कारवाई
By राजन मगरुळकर | Published: September 16, 2022 05:05 PM2022-09-16T17:05:17+5:302022-09-16T17:06:11+5:30
शहरातील कोतवाली ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या.
परभणी : सर्वसामान्यांसाठी आलेला रेशनच्या तांदळाचा साठा करून सदर मालाची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात चार ठिकाणी कारवाई केली. यात एकूण १८५.५ क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.
शहरातील कोतवाली ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलीस पथकाने २ लाख ७५ हजार ७८१ रूपयांच्या तांदळासह ५ लाख ५० हजारांचे दोन वाहन असा एकूण आठ लाख २५ हजार ७८१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ८ आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
यात जिंतूर ते साखरतळा रस्त्यावर जिंतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३७ पोते तांदूळ जप्त केला आहे. तर गंगाखेडमध्ये आडत गोडावूनमध्ये साठवलेल्या तांदूळ साठ्यावर कारवाई करण्यात आली. यात ३० पोते रेशनचा तांदूळ जप्त केला. यात एकूण १६ हजार ७३१ रूपयांचा १२ क्विंटल ८७ किलो तांदूळ जप्त केला आहे. पूर्णा तालुक्यात नांदगाव फाटा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५१ पोते तांदूळ जप्त केला आहे. यात एकूण ४४ हजार ८५० रूपयांचा ९० किलो रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. तसेच परभणी शहरातील नवा मोंढा भागात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६० पोते तांदूळ जप्त केला आहे. यात एकूण ४५ हजार रूपयांचा ३० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.