वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास १९ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 07:46 PM2018-03-26T19:46:43+5:302018-03-26T19:46:43+5:30
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला शासनाने सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यापीठास १९ कोटी २० लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला शासनाने सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यापीठास १९ कोटी २० लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २१ मार्च रोजी अद्यादेश काढून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या चारही विद्यापीठांना सुधारित अनुदान वितरित करण्यात आले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ९ कोटी २१ लाख ८९ हजार रुपयांचे वेतनेत्तर सहाय्यक अनुदान या शासन आदेशानुसार प्राप्त झाले आहे. वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी विद्यापीठाकडे १० कोटी रुपयांची मूळ तरतूद होती. पूरक अनुदान व मूळ तरतूद अशी ११ कोटी ५२ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद होती. प्रत्यक्षात ९ कोटी २१ लाख ८९ हजार रुपये विद्यापीठास प्राप्त झाले असून तरतुदीच्या तुलनेत २ कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची तूट झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशू संवर्धन विभागाच्या कार्यासन अधिकारी भारती धुरी यांनी हे अनुदान मंजूर केले आहे. अनुदान मंजूर करीत असताना ते उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या नावे दिले असून उपविभागीय कृषी अधिकार्यांनी हे अनुदान कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांना अदा करावयाचे आहे. तसेच ज्या योजनेसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. त्याच योजनेसाठी खर्च करावा, असे स्पष्ट निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.
अनिवार्य योजनेतूनही विद्यापीठास अनुदान
शासनाने अन्य एका अद्यादेशाद्वारे सुधारित अंदाजानुसार अनिवार्य योजनेसाठीही अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या या आदेशानुसार पीक संवर्धन या लेखाशिर्षाखाली निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ५७ कोटी ६६ लाख ५६ हजार, वेतनेत्तर सहाय्यक अनुदान ६ कोटी ८१ लाख ८४ हजार, वेतनासाठीचे सहाय्यक अनुदान ८९ कोटी ८८ लाख ८७ हजार असे १५४ कोटी ३७ लाख २७ हजार रुपये वितरणास मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे पशू संवर्धन लेखाशिर्षाअंतर्गत इतर संस्थांना सहाय्य करण्यासाठी वेतनेत्तर सहाय्यक अनुदान ७ लाख ४ हजार रुपये तर वेतनासाठीचे अनुदान १ कोटी ८८ लाख १७ हजार असे १ कोटी ९५ लाख २१ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण या लेखाशिर्षाखाली निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ५ कोटी ८६ लाख १२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शैक्षणिक फीसाठी ९ कोटी ९९ लाख
राज्य शासनाने याच अध्यादेशाद्वारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ९ कोटी ९९ लाख रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहाय्यक अनुदान म्हणून वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी जेवढी तरतूद उपलब्ध केली होती. तेवढीच तरतूद राज्य शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न निकाली निघाला आहे.