१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 12:35 PM2017-12-07T12:35:40+5:302017-12-07T12:37:10+5:30
पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही.
परभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. यासोबतच याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी साफ दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांची चांगलीच गोची होत आहे़
लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०़६० किमी रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामास औरंगाबाद येथील सा.बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १० मार्च २०१६ रोजी प्रशासकीय तर ७ सप्टेंबर २०१६ रोजी तांत्रिक मान्यता दिली़ यासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली़ या निधीतून १०.६० किमी रस्त्याच्या कामासह मार्गावर १६ नळकांडी पूल उभारायचे आहेत़ तसेच या रस्त्यावर ३.७५ मीटर डांबरी प्रृष्टाच्या दोन्ही बाजुस स्कंदाचे अस्तित्वातील माती काम ०.४५ मीटर खोलीस खोदकाम करणे व त्यावर माती टाकून दबई करणे, डांबरी पृष्टाच्या दोन्ही बाजुस १़६५ मीटर रुंद १५ सेमी जाडीचा जीएसबीचा थर देणे व त्या बाजुस १५ सेमी जाडीस कठीण मुरमाचा थर देणे, दबई करणे आदी कामे समाविष्ट आहेत़ तसेच पूर्णा शहरातील लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी २०० मीटर काँक्रीट नाली बांधकाम करणे आदी कामे करणे अंदाजपत्रकात समाविष्ट आहेत.
हे काम मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत कामाची गती अत्यंत मंदावली आहे़ या रस्ता कामावर माती मिश्रीत चुरीचा वापर केला जात असून, रस्त्याची दबईही थातूरमातूर केली जात आहे. शिवाय या रस्त्यावरील गॅस एजन्सीसमोरील रस्ता कामास अद्यापही सुरुवात झालेली नाही़ विशेष म्हणजे एका कंत्राटदाराला हे काम सुटलेले असताना या कामाचे तुकडे पाडून ते चार उप कंत्राटदारांमार्फत केले जात आहे़
अधिका-यांना मिळेना वेळ
एकीकडे तब्बल १९ कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या रस्ता कामाकडे पाहण्यास सा़बां़ विभागाच्या अधिका-यांना वेळ मिळेनासा झाला आहे़ १० किमीच्या कामात चार तुकडे करण्यात आले असून, या कामाचा दर्जा समाधानकारक रहावा, या अनुषंगाने अधिका-यांकडून नियमितपणे या कामाची पाहणी केली जात नसल्याच्या या भागातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत़ विशेष म्हणजे पंचायतराज समितीच्या दौ-यात आ़ विक्रम काळे यांनीही या कामासंदर्भात तक्रार केली होती़ परंतु, सा़बां़ विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ती तक्रार गांभीर्याने घेतली नाही़