१९ हजार कृषीपंपधारकांनी भरले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:22+5:302021-03-20T04:16:22+5:30
परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ ...
परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. त्यामुळे या अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंपधारकांना वीज पुरवठा केला जातो. या कृषीपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल जनरेट करून वितरित केले जाते. मात्र सततचा दुष्काळ व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे विद्युत बिलाचा भरणा वेळेवर करणे बळीराजा शक्य होत नाही. परिणामी जिल्ह्यातील विद्युत बिलाच्या थकबाकीचा डोंगर १३८६ कोटी ८९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. वाढत असलेल्या थकबाकीमुळे येथील वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांना आलेल्या वीज समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यातच आता राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले आहे. या अभियानांतर्गत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना घसघसीत सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथील वीज वितरण कंपनीच्यावतीने मागील महिन्याभरापासून विशेष वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंप धारकांपैकी १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. त्यामुळे महावितरणच्या या महाकृषी ऊर्जा अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
तालुकानिहाय भरणा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत गंगाखेड तालुक्यातील १ हजार ५५१ शेतकऱ्यांनी ७५ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील ३ हजार ३६२ शेतकऱ्यांनी ९५ लाख ४१ हजार, मानवत तालुक्यातील १ हजार ७३३ शेतकऱ्यांनी ५५ लाख ५ हजार पालम तालुक्यातील १ हजार ४८३ शेतकऱ्यांनी १ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. तसेच परभणी तालुक्यातील ३ हजार ५६५ शेतकऱ्यांनी १ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, पाथरी २ हजार २७९ शेतकऱ्यांनी ८५ लाख ५५ हजार, पूर्णा तालुक्यातील १ हजार ९०९ शेतकऱ्यांनी ८४ लाख २९ हजार, सेलू तालुक्यातील २ हजार २४६ शेतकऱ्यांनी ७७ लाख २ हजार, तर सोनपेठ तालुक्यातील १ हजार २९ शेतकऱ्यांनी ५० लाख ३६ हजार रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला आहे.