परभणी जिल्ह्यात २ दिवस कडक संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:11 AM2020-04-23T00:11:21+5:302020-04-23T00:11:56+5:30
बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़
जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असतानाही अनेक जण सिमा ओलांडून जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत़ शहरातही वेळोवेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले जात आहे़ अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे़
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन वैद्यकीय, आपत्कालीन व अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर लोकांना आणि वाहनांना नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ महानगरपालिकेच्या हद्दीत आणि परिसरातील ५ किमीपर्यंत तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या हद्दीमध्ये व लगतच्या ३ किमी परिसरात २२ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ते २४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे़
संचारबंदीतून या सेवांना सूट
सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणाऱ्या एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने आणि व्यक्ती, वैद्यकीय आपत्काल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक, गॅस सिलिंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने, दूध विक्रेते, खत वाहतूक, त्यांचे गोदामे, दुकाने, त्यासाठी लागणारी वाहने व कामगारांना या संचारबंदीतून सूट दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे़