कोचिंग क्लासच्या तिजोरीतील २० लाख पळवणारे दोघे ताब्यात; ८ लाखांतून घेतली चोरट्यांनी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 04:58 PM2024-02-01T16:58:55+5:302024-02-01T16:59:30+5:30
या चोरट्यांनी गुन्हा कबूल केला असून याच रक्कमेतून कार घेतल्याचे सांगितले
परभणी : कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या घटनेत दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले. खासगी शिकवणीच्या कार्यालयातून लॉकरमध्ये ठेवलेले वीस लाख या चोरट्यांनी चोरले होते. यात पोलिसांनी नऊ लाख ८५ हजार ४०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे चोरट्याने याच रकमेतून आठ लाखाची कारसुध्दा खरेदी केली होती.
विठ्ठल कांगणे यांनी याबाबत कोतवाली ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल दिली होती. हा प्रकार त्यांच्या इनायत नगरातील करिअर अकॅडमीच्या कार्यालयात घडला होता. लॉकरमध्ये ठेवलेले वीस लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी गुन्हा नोंद केला होता. सदरील गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक रागसुधा. आर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सागर गणेश वंजारे (१९, रा.पांगरा डोळा, ता.लोणार, जि.बुलढाणा), विकास अरुण जायभाय (१९, रा.पांगरा डोळा, ता.लोणार जि.बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतले. सदरील आरोपींना सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले.
या चोरट्यांनी याच रकमेतून वस्तू खरेदी केल्याचे व गुन्हा कबूल केल्याचे सांगितले. त्यांना तपास कामी कोतवाली ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, विलास सातपुते, राहुल परसोडे, दिलावर पठाण, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव दुबे, राम पौळ, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांनी केली.
चक्क चोरीच्या पैशातून घेतली कार
यामध्ये वीस लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी आठ लाख रुपयांची आरोपीने चोरीच्या पैशांतून खरेदी केलेली कार आणि इतर एक लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.