परभणी जिल्ह्यात पोषण आहाराचे २० कोटी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:53 AM2018-07-08T00:53:02+5:302018-07-08T00:53:43+5:30
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांच्या निधीपैकी तब्बल २० कोटी ३ लाख ७१ हजार ९१० रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांच्या निधीपैकी तब्बल २० कोटी ३ लाख ७१ हजार ९१० रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची बाब समोर आली आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित, विना अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन शासनाकडून मोफत दिले जाते. परभणी जिल्ह्यात एकूण १ हजार ५९० शाळांमधील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या विद्यार्थ्यांसाठी शासनाने २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला होता. त्यामध्ये केंद्र शासनाने १२ कोटी ७० लाख ९५ हजार ९७८ रुपये तर राज्य शासनाने ८ कोटी ५९ लाख ३१ हजार ९९९ रुपये दिले होते. हा निधी इंधन, भाजीपाला, धान्य, स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन, व्यवस्थापन व सनियंत्रण आणि भांडे खरेदी तसेच मुख्याध्यापकांचे मानधन आदींसाठी दिला होता. दिलेली रक्कम त्याच आर्थिक वर्षात खर्च होणे अपेक्षित होते; परंतु, प्रशासकीय कामकाजातील लालफितीच्या कारभारामुळे या आर्थिक वर्षात फक्त १ कोटी २६ लाख ५६ हजार ६६७ रुपयांचीच रक्कम खर्च झाली. त्यामध्ये केंद्र शासनाच्या ७६ लाख ३ हजार ४४ रुपयांची तर राज्य शासनाच्या ५० लाख ५३ हजार ६२३ रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्या बैठकीत मे अखेरपर्यंतचा झालेल्या खर्चाचा अहवाल शिक्षण विभागाच्या वतीने सादर करण्यात आला. त्यामध्ये ही बाब समोर आली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय पोषण आहाराची रक्कम कशी काय? शिल्लक राहिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
---
जिल्ह्यात १५९० शाळांमध्ये अडीच लाख लाभार्थी
शालेय पोषण आहार योजना जिल्ह्यातील १५९० शाळांमध्ये लागू असून त्याचा २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांना लाभ होतो. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील २१२ शाळांमधील २८ हजार १०६ विद्यार्थी, जिंतूर तालुक्यातील २८८ शाळांमधील ३५ हजार ८५४ विद्यार्थी, मानवत तालुक्यातील ८५ शाळांमधील ९ हजार ४६५ विद्यार्थी, पालम तालुक्यातील १३८ शाळांमधील १३ हजार ११७ विद्यार्थी, परभणी तालुक्यातील ग्रामीण भागातील १९१ शाळांमधील ३७ हजार ९१२ विद्यार्थी, परभणी महापालिका हद्दीतील १४९ शाळांमधील ५४ हजार ८८९ विद्यार्थी, पाथरी तालुक्यातील १३२ शाळांमधील १८ हजार ९६८ विद्यार्थी, पूर्णा तालुक्यातील १४९ शाळांमधील २३ हजार १५० विद्यार्थी, सेलू तालुक्यातील १४५ शाळांमधील २२ हजार ४४१ विद्यार्थी आणि सोनपेठ तालुक्यातील १०१ शाळांमधील १० हजार ६८७ विद्यार्थी संख्येचा समावेश आहे.
---
स्वयंपाकी, मदतनीस यांचे १ कोटी ७० लाख पडून
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करणारे स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्याकरीता केंद्र शासनाने मानधनापोटी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ५९ लाख ९८ हजार रुपये तर राज्य शासनाने ६४ लाख ४४ हजार १३२ रुपये असे एकूण १ कोटी ७० लाख ३४ हजार २३० रुपयांचे मानधन उपलब्ध करुन दिले; परंतु, २०१७-१८ या वर्षात संबंधितांना वितरित केले गेले नाही. त्यामुळे हा निधीही अखर्चितमध्ये असल्याचे जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
---
मार्च अखेरीस यातील बहुतांश निधी प्राप्त झाला आहे. शालेय पोषण आहाराच्या पुरवठादारांचे तसेच काही शाळांची देयके बाकी आहेत. अन्न आयोगाचे निर्देश आलेले नाहीत. त्यांचे निर्देश आल्यानंतर निधी वितरित केला जाईल. आणखी काही निधी शिल्लक असेल तर तोही काही दिवसातच संबंधितांना दिला जाईल. हा निधी २ वर्षात खर्च करता येतो. त्यामुळे गतवर्षीचा निधी चालू वर्षीही खर्च करण्यात काहीही अडचण नाही.
-आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी