परभणी लोकसभेसाठी २१ अपक्ष निवडणूक रिंगणात; उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार ?
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 10, 2024 01:29 PM2024-04-10T13:29:08+5:302024-04-10T13:29:49+5:30
एकूण ४१ उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतल्याने ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
परभणी : निवडणूक म्हटलं की, एक एक मतासाठी उमेदवारांना आपल्या जिवाचं रान करावं लागत आहे. निवडून येण्यासाठी अपेक्षित मतांची जुळवाजुळव, आकडेमोड करून विजयाची गणिते मांडावी लागतात. मात्र, यात एक, दोघांपेक्षा अधिक उमेदवारांसह इतर कुणी उमेदवारांच्या विरोधात गेले तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तशीच काहीशी परिस्थिती परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहे. यात १३ उमेदवार विविध पक्षांकडून निवडणुकीला सामोरे जात असून, तब्बल २१ जण अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. त्यामुळे हे अपक्ष उमेदवार नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतात, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
लोकसभेच्या या आखाड्यात सोमवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण ४१ उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतल्याने ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. यात १३ उमेदवार हे महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, स्वराज्य शक्ती सेना, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी यांसह विविध पक्षांचे असून, तब्बल २१ उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार असून, हे अपक्ष उमेदवार कोणाची आणि किती मते घेतात, यावरून विजयाची समीकरणे मांडण्यात येत आहेत. सोमवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना त्यांच्या चिन्हांचे वाटप केल्याने अनेकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. २६ एप्रिलला परभणी मतदारसंघातील २ हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
परभणी लोकसभा : २१ लाख २३ हजार मतदार
जिंतूर ३,७२,९७७
परभणी ३,३५,३९७
गंगाखेड ४,०८,९०८
पाथरी ३,७९,०१४
परतूर ३,११,३५०
घनसांवगी ३,१५,४१०
विविध पक्षांकडून मैदानात असलेले उमेदवार
आलमगीर मोहम्मद खान, संजय हरिभाऊ जाधव, कैलास बळीराम पवार, डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे, महादेव जगन्नाथ जानकर, दशरथ प्रभाकर राठोड, पंजाब उत्तमराव डख, राजन रामचंद्र क्षीरसागर, विनोद छगनराव अंभुरे, शेख सलीम शेख इब्राहिम, सयद इरशाद अली, संगीता व्यंकटराव गिरी, श्रीराम बन्सीलाल जाधव यांचा समावेश आहे.
निवडणुकीतील अपक्ष उमेदवार
अनिल माणिकराव मुदगलकर, अर्जुन ज्ञानोबा भिसे, आप्पासाहेब ओंकार कदम, शिवाजी देवजी कांबळे, कारभारी कुंडलिक मिठे, किशोर राधाकिशन ढगे, किशोरकुमार प्रकाश शिंदे, कृष्णा त्रिंबकराव पवार, गणपत देवराव भिसे, गोविंद रामराव देशमुख, बोबडे सखाराम ग्यानबा, मुस्तफा मैनोदिन शेख, राजाभाऊ शेषराव काकडे, राजेंद्र अटकळ, विजय अण्णासाहेब ठोंबरे, विलास तांगडे, विष्णुदास शिवाजी भोसले, समीरराव गणेशराव दूधगावकर, सय्यद अब्दुल सत्तार, सुभाष दत्तराव जावळे, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.