सप्ताहात महापंगतीमधील भगरीच्या प्रसादातून २२५ जणांना विषबाधा
By मारोती जुंबडे | Published: February 7, 2024 05:24 PM2024-02-07T17:24:28+5:302024-02-07T17:25:16+5:30
या रुग्णांमध्ये ८ वर्षीय बालकांपासून ते ६० वर्षीय नागरिकांचा समावेश आहे.
परभणी: तालुक्यातील सोन्ना येथे आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथे दरम्यान महापंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे सेवन केलेल्या २२५ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास समोर आला. या सर्व रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
सोन्ना ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १ फेब्रुवारीपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता ८ फेब्रुवारी रोजी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाने होणार आहे. परंतु, ६ फेब्रुवारी रोजी हभप माऊली महाराज मुडेकर यांच्या कीर्तनानंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, एकादशी असल्याने ग्रामस्थांसाठी आयोजकांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भगरीचा प्रसाद तयार केला होता. हा महाप्रसाद ग्रामस्थांनी सेवन केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास लहान बालकांसह वयोवृद्ध ग्रामस्थांना उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले.
परंतु, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास रुग्णांची संख्या २२५ वर जाऊन पोहोचली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी तज्ञ डॉक्टरांसह रुग्णांकडे धाव घेतली. त्यानंतर रुग्णांवर योग्य तो उपचार करून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. लखमवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी दिली भेट
सोन्ना येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान असलेल्या महापंक्तीतील प्रसादातून विषबाधेचा प्रकार समोर आला. त्यानंतर ही माहिती ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिली. माहिती मिळतात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, तहसीलदारांसह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोन्ना येथे मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास धाव घेऊन भेट दिली. तसेच ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
आठ ते साठ वर्ष रुग्णांचा समावेश
सप्ताह सांगतेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आयोजित महाप्रसादातून परभणी तालुक्यातील सोन्ना येथील २२५ ग्रामस्थांना विषबाधा झाली. या सर्व ग्रामस्थांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये ८ वर्षीय बालकांपासून ते ६० वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.