आंतरराज्य जनावर चोर टोळीच्या २५ गुन्ह्यांचा उलगडा, परभणी स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई

By राजन मगरुळकर | Published: June 9, 2024 04:35 PM2024-06-09T16:35:02+5:302024-06-09T16:35:25+5:30

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात चालू वर्षातील जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला.

25 crimes of inter-state cattle rustling gang solved, Parbhani local crime branch squad action | आंतरराज्य जनावर चोर टोळीच्या २५ गुन्ह्यांचा उलगडा, परभणी स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई

आंतरराज्य जनावर चोर टोळीच्या २५ गुन्ह्यांचा उलगडा, परभणी स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई


परभणी : जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी जनावर चोरणाऱ्या टोळीच्या परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यामध्ये एकूण सहा जिल्ह्यातील २५ गुन्ह्यांचा उलगडा या पथकाने केला. यात एक लाख ६८ हजार पाचशे रुपये नगदी व गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यारे जप्त केली आहेत. या आरोपींनी यापूर्वी रात्रगस्त करणाऱ्या वसमत आणि पूर्णा पोलिसांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्याची देखील उकल झाली आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात चालू वर्षातील जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या सूचना, आदेश दिले. पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी गोपनीय माहिती मिळाल्यावर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मुत्येपोड, गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार यांचे पथक तयार करून रवाना केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी गजानन काशिनाथ वाघमारे (३४, रा.शांतीनिकेतन कॉलनी, परभणी) यास ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे साथीदार जाकेर मन्सार कुरेशी (३४, रा.जमजम कॉलनी परभणी) व सुरेश देवराव खिल्लारे (३४, रा.मंत्री नगर, परभणी) या आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफिने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे हरियाणा राज्यातील व स्थानिक इतर १० साक्षीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची माहिती दिली.

या ठिकाणचे गुन्हे उघड
परभणी जिल्ह्यातील १३, जालना एक, वाशिम दोन, नांदेड तीन, लातूर तीन, हिंगोलीतील तीन अशा २५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. गुन्हे करण्यास वापरलेले हत्यार, मोबाईल व नगदी एक लाख ६८ हजार ५०० रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण पाच लाख ६८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. इतर साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोपीकडे इतर राज्यात स्वतंत्र पथके फरार आरोपी शोध घेऊन तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

पोलीस वाहनावरील दगडफेक गुन्ह्याची उकल
पोलीस नियंत्रण कक्ष परभणी येथे २६ मे रोजी पहाटे सव्वाचार वाजता माहिती मिळाली होती. एक वाहन संशयितरित्या परभणीच्या दिशेने येत आहे. त्यावरून पूर्णा ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या शासकीय वाहनाने पाठलाग करताना सदर आरोपींनी दगडफेक करून पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यावरून पूर्णा ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याची देखील उकल झाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार करीत आहेत.

यांची गुन्हा उलगडण्यास मदत
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मुत्येपोड, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस कर्मचारी बालासाहेब तूपसमुद्रे, रवी जाधव, दिलावर खान पठाण, रफीयोद्दीन शेख, निलेश परसोडे, विलास सातपुते, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप नीलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रे, मोहम्मद इमरान, सायबरचे गणेश कौटकर, राजेश आगाशे यांनी केली.
 

Web Title: 25 crimes of inter-state cattle rustling gang solved, Parbhani local crime branch squad action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.